भारतातील ‘मुद्रित’ (प्रिंट) आणि ‘प्रसारण’ (ब्रॉडकास्ट) पत्रकारितेमध्ये दाखविली गेलेली बांधीलकी, धैर्य आणि उत्तमता यांना सन्मानित करणारे ‘रामनाथ गोएंका सर्वोत्तम पत्रकारिता पुरस्कार’ येत्या २३ जुलै रोजी वितरित केले जाणार आहेत. भारताचे नवनियुक्त सरन्यायाधीश पी. सथशिवम् यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील ताज पॅलेस हॉटेलमध्ये हा सोहळा रंगणार आहे.
एक्सप्रेस समूहाचे संस्थापक रामनाथ गोएंका यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सन २००६ पासून हा पुरस्कार देण्यात येतो. गेल्या काही वर्षांत भारतीय पत्रकारितेतील सर्वोच्च सन्मान म्हणून प्रत्येक जण या पुरस्काराकडे पाहू लागला आहे. स्वाभाविकच, आज हा पुरस्कार मिळावा अशी सुप्त इच्छा प्रत्येकच पत्रकाराच्या मनात दडलेली असते. लक्षवेधक आणि आपल्या वेगळेपणाने उठून दिसणाऱ्या सर्वोत्तम बातम्या आणि त्या बातम्या ‘वेचणारे’ पत्रकार यांचा सन्मान या सोहळ्यात करण्यात येतो. तपशिलातील अचूकता, शुद्धपणा आणि ‘रिपोर्ताज’मधील नैतिकता ही त्रिसूत्रे ‘द इंडियन एक्सप्रेस ग्रुप’ने नेहमीच पाळली आहेत आणि अशी सूत्रे पाळणाऱ्यांनाच हा सुवर्णसन्मान देण्यात येतो.
गेल्या वर्षी म्हणजेच सहाव्या रामनाथ गोएंका पुरस्कार सोहळ्यातील पुरस्कारप्राप्त बातम्यांचे आणि वृत्तांकनांचे संकलन या वर्षी पुस्तकरूपाने प्रकाशित करण्यात येणार आहे. या संग्रहामध्ये राजकारण, पर्यावरण, व्यापार, खेळ आणि चित्रपट क्षेत्रातील तसेच वादग्रस्त ठरलेल्या बाबींवरील आणि ‘अदृश्य भारता’ची ओळख करून देणाऱ्या वृत्तांकनाचा समावेश असेल. गेल्या वर्षभरात प्रसिद्ध झालेली आणि जनमतावर प्रभाव पाडणारी ही वृत्तांकने असतील. पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर, ‘सोशल मीडियाची भीती कुणाला?’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे.
या सोहळ्यात देण्यात येणारे पुरस्कार आणि त्यांचे स्वरूप
*रामनाथ गोएंका सर्वोत्तम पत्रकार पुरस्कार – (मुद्रित आणि प्रसारण असा दोन संवर्गात स्वतंत्रपणे) – अडीच लाख रुपये रोख
*अन्य विभागातील प्रत्येक पुरस्कार हे प्रत्येकी एक लाख रुपयांचे असतील.
*या वर्षीपासून प्रथमच जीवनगौरव पुरस्कारही वितरित करण्यात येणार.
प्रतिष्ठेच्या ‘रामनाथ गोएंका पुरस्कारां’चे वितरण २३ जुलैला
भारतातील ‘मुद्रित’ (प्रिंट) आणि ‘प्रसारण’ (ब्रॉडकास्ट) पत्रकारितेमध्ये दाखविली गेलेली बांधीलकी, धैर्य आणि उत्तमता यांना सन्मानित करणारे ‘रामनाथ गोएंका सर्वोत्तम पत्रकारिता पुरस्कार’ येत्या २३ जुलै रोजी वितरित केले जाणार आहेत.

First published on: 20-07-2013 at 02:58 IST
TOPICSपी सथशिवम
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramnath goenka excellence in journalism awards it is time to celebrate the best in indian journalism once again