PM Modi Meets Rampal Kashyap Video: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल (१४ एप्रिल), डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, हरियाणातील हिसार येथील महाराजा अग्रसेन विमानतळावरून अयोध्येला जाणाऱ्या पहिल्या प्रवासी विमानाला हिरवा झेंडा दाखवला. यानंतर त्यांनी याच विमानतळावर नवीन टर्मिनल इमारतीचे भूमीपूजन केले. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी यमुना नगरला भेट दिली. यमुना नगरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रामपाल कश्यप या त्यांच्या समर्थकाच्या पायात स्वतःच्या हातांनी बूट घातले आणि त्यांचा सन्मान केला.

रामपाल कश्यप कोण आहे?

दरम्यान रामपाल कश्यप हे हरियाणातील कैथल जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी १४ वर्षांपूर्वी प्रतिज्ञा केली होती की, जोपर्यंत नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होत नाहीत आणि जोपर्यंत ते स्वतः पंतप्रधान मोदींना भेटत नाहीत तोपर्यंत ते बूट घालणार नाहीत. काल पंतप्रधान मोदींनी त्यांना भेटून स्वतःच्या हातांनी त्यांच्या पायात बूट घातले. या दरम्यान पंतप्रधान मोदी यांनी रामपाल कश्यप यांना पुढे भविष्यात कधीही अशी शपथ घेऊ नका असे आवाहन केले.

पंतप्रधान मोदींनी शेअर केला व्हिडिओ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः इन्स्टाग्रमावर व्हिडिओ शेअर करून याची माहिती दिली आहे. त्यांनी व्हिडिओ शअर करताना लिहिले की, “यमुना नगरमधील आजच्या जाहीर सभेत, मी कैथल येथील रामपाल कश्यप यांना भेटलो. त्यांनी १४ वर्षांपूर्वी शपथ घेतली होती की, मी पंतप्रधान झाल्यानंतरच ते बूट घालून मला भेटतील. मी रामपाल यांच्यासारख्या लोकांना नमन करतो आणि त्यांचा स्नेह देखील स्वीकारतो, परंतु अशा शपथ घेणाऱ्या सर्वांना मी विनंती करू इच्छितो की, तुमच्या प्रेमाचे मी कौतुक करतो. यापेक्षा तुम्ही सामाजिक कार्य आणि राष्ट्र उभारणीशी संबंधित कामांवर लक्ष केंद्रित करा!”

पंतप्रधान मोदी आणि रामपाल कश्यप यांच्यातील संवाद

पंतप्रधान मोद यांनी एक्स आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, कश्यप मोदींना भेटण्यासाठी अनवाणी चालताना दिसत आहेत, यावेळी पंतप्रधान त्यांना हात दाखवत स्वागत करताना दिसत आहेत. त्यानंतर दोघेही सोफ्यावर बसल्यानंतर, मोदी कश्यप यांना विचारतात, “तुम्ही असे का केले? तुम्ही हा त्रास का करुन घेतला?” दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.