Bangladesh : बांगलादेशमधील दिनाजपूरच्या बिरल उपजिल्हा येथील एका हिंदू नेत्याचं अपहरण करून त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. वृत्तानुसार, भावेश चंद्र रॉय असं त्यांचं नाव आहे. ते त्या भागातील हिंदू समुदायाचे एक प्रमुख नेते होते आणि त्यांनी बांगलादेश पूजा उत्सव परिषदेच्या बिरल युनिटचे उपाध्यक्ष म्हणूनही काम केलेलं आहे. भावेश चंद्र रॉय यांच्या हत्येच्या घटनेनंतर एकच खळबळ उडाली.

बांगलादेशमधील हिंदू समुदायाचे नेते भावेश चंद्र रॉय यांच्या हत्येचा घटनेचा भारताने निषेध व्यक्त केला आहे. तसेच भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया देत बांगलादेशाला सुनावलं आहे. अल्पसंख्याकांच्या हक्कांचं रक्षण केलं पाहिजे, बांगलादेशाने हिंदूंसह सर्व अल्पसंख्याकांचं संरक्षण करण्याची जबाबदारी पार पाडावी”, असं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे. या संदर्भातील वृत्त हिंदुस्तान टाईम्सने दिलं आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी काय म्हटलं?

भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट करत म्हटलं आहे की, “आम्ही या घटनेचा निषेध करतो आणि पुन्हा एकदा बांगलादेशच्या अंतरिम सरकारला आठवण करून देतो की त्यांनी कोणतेही कारण न सांगता किंवा भेदभाव न करता हिंदूंसह सर्व अल्पसंख्याकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पार पाडावी”, असं रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, भावेश चंद्र रॉय यांना बांगलादेश पूजा उत्सव परिषदेच्या बिरल युनिटचे उपाध्यक्ष आणि परिसरातील हिंदू समुदायाचे एक प्रमुख नेते म्हणून ओळखले जात होते. मात्र, अचानक त्यांचं अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली. दरम्यान, बांगलादेशातील आघाडीच्या वृत्तपत्र द डेली स्टारशी बोलताना चंद्रा यांच्या पत्नी शांतना रॉय यांनी म्हटलं की, “गुरुवारी दोन मोटारसायकलींवर चार जण आले होते. त्यांनी भावेश यांचं घरातून अपहरण केलं. त्यानंतर त्यांना हल्लेखोरांनी एका ठिकाणी घेऊन जाऊन तिथे त्यांची क्रूरपणे हत्या केली”, असा दावा पत्नी शांतना रॉय यांनी केला.

चंद्रा यांच्या पत्नी शांतना रॉय यांनी म्हटलं की, “दुपारी ४:३० च्या सुमारास एक फोन आला होता. मात्र, तो फोन भावेश चंद्र रॉय हे घरी आले का? किंवा घरी आहेत का? याची खात्री करण्यासाठी गुन्हेगारांनी हा फोन केला होता. त्यानंतर त्यांचं अपहरण करून मारहाण करण्यात आली. फोन आल्याच्या ३० मिनिटांनंतर चार जण दोन दुचारीवरून आले आणि त्यांनी भावेश चंद्र रॉय यांचं अपहरण केलं, त्यानंतर त्यांना एका गावात घेऊन जात त्या ठिकाणी त्यांची हत्या केली. ही घटना समजल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता”, असं पत्नी शांतना रॉय यांनी म्हटलं आहे.