Why Ranjani Srinivasan Left US: डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने ‘दहशतवाद्यांना सहानुभूती देणारी’ असल्याच्या आरोपावरून विद्यार्थी व्हिसा रद्द केल्यानंतर भारतीय विद्यार्थिनी रंजनी श्रीनिवासन अमेरिकेतून कॅनडाला रवाना झाली. स्वतःहून देश सोडल्यानंतर रंजनीने पहिल्याच अमेरिका सोडण्याचे कारण सांगितले आहे.
अमेरिकेतील वातावरण खूप धोकादायक
न्यू यॉर्क टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत, ३७ वर्षीय रंजनी श्रीनिवासनने सांगितले की, वातावरण धोकादायक असल्याचे वाटल्याने तिने न्यू यॉर्क सोडून कॅनडाला जाण्याचा निर्णय घाईघाईने घेतला.
“अमेरिकेतील वातावरण खूप अस्थिर आणि धोकादायक वाटत होते. म्हणून मी लगेच निर्णय घेतला,” असे रंजनी मुलाखतीत म्हणाली. रंजनी श्रीनिवासन कोलंबिया विद्यापीठात पीएचडी स्कॉलर होती आणि शहरी नियोजनात डॉक्टरेट करत होती. याआधी तिने फुलब्राइट शिष्यवृत्तीद्वारे हार्वर्डमधून पदव्युत्तर पदवी मिळवली आहे.
मला भीती वाटते की…
“मला भीती वाटते की अगदी खालच्या दर्जाचे राजकीय भाषण किंवा सोशल मीडियावर ओरडणेदेखील एक भयानक दुःस्वप्न बनू शकते. जिथे कोणीतरी तुम्हाला दहशतवादांना सहानुभूती देणारे म्हणत असेल तिथे तुम्हाला तुमच्या जीवाची आणि सुरक्षिततेची भीती वाटू शकते,” असेही रंजनी मुलाखतीत म्हणाली.
एका आठवड्यापूर्वी तिला शोधण्यासाठी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये फेडरल एजंट तिच्या घरी आले होते. त्यावेळी तिने दार उघडले नाही म्हणून ते माघारी गेले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी एजंट तिला शोधण्यासाठी पुन्हा येण्यापूर्वीच तिने लागार्डिया विमानतळावरून कॅनडा गाठले.
कोलंबिया विद्यापीठात डॉक्टरेटची विद्यार्थिनी असलेल्या रंजनी श्रीनिवासनचा व्हिसा अमेरिकन प्रशासनाने रद्द केलेल्यानंतर, तिने सीबीपी होम (Customs and Border Protection) अॅपद्वारे स्वतः देश सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ती कॅनडाला रवाना झाली. रंजनीवर हमासला पाठिंबा देण्याचा आरोप होता. सुरक्षेच्या कारणास्तव तिचा व्हिसा रद्द करण्यात आल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
कोण आहे रंजनी श्रीनिवासन?
रंजनी श्रीनिवासन कोलंबिया विद्यापीठात शहरी नियोजनात डॉक्टरेट करत होती. ती एफ-१ व्हिसावर अमेरिकेत शिक्षण घेत होती. त्याच वेळी, डिपार्टमेंट ऑफ होमलँड सेक्युरिटीजने आरोप केला की, ती दहशतवादी संघटना हमासला पाठिंबा देत होती. रंजनीची शैक्षणिक पार्श्वभूमी खूप चांगली आहे. तिने कोलंबिया विद्यापीठातून शहरी नियोजनात एम.फिल केले. याशिवाय, ती स्कूल ऑफ आर्किटेक्चरमधून पदवीधर आहे. तिने हार्वर्ड विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतली. यासह CEPT विद्यापीठातून बॅचलर ऑफ डिझाइन कोर्स देखील पूर्ण केला आहे.