देशाचे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी एका कार्यक्रमात वीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या विधानावरून देशाच्या राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे. “महात्मा गांधींच्या सल्ल्यावरूनच सावरकरांनी दया याचिका दाखल केली होती”, असं राजनाथ सिंह म्हणाले आहेत. यावरून वाद सुरू असताना एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी देखील राजनाथ सिंह यांच्या विधानावरून भूमिका मांडली आहे. त्या मुद्द्यावर आता स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मला वाटत नाही की गांधीजी देशाचे राष्ट्रपिता आहेत”, असं रणजीत सावरकर म्हणाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राजनाथ सिंह यांनी केलेल्या विधानावर टीका करताना एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी भाजपावर निशाणा साधला. “हे चुकीचा इतिहास सादर करत आहेत. जर हे असंच चालत राहिलं, तर ते महात्मा गांधींना हटवून ज्या सावरकरांवर महात्मा गांधींच्या हत्येचा आरोप होता आणि जस्टिस जीवनलाल कपूर यांच्या चौकशीत त्यांना दोषी ठरवण्यात आले होते, त्या सावरकरांना राष्ट्रपिता बनवतील”, असं ओवैसी म्हणाले आहेत. या मुद्द्यावर विचारणा केली असता रणजीत सावरकर यांनी एएनआयशी बोलताना आपली भूमिका मांडली आहे.

“भारताला ५ हजार वर्षांचा इतिहास”

“भारतासारख्या देशाला एक राष्ट्रपिता असू शकत नाही. देशाच्या निर्मितीसाठी हातभार लावणारे हजारो लोक असतील जे आता विस्मृतीत गेले असतील. या देशाला ५ हजार वर्षांपेक्षा जास्त मोठा इतिहास आहे. त्यामुळे एक कुठली व्यक्ती देशाची राष्ट्रपिता होऊ शकत नाही”, असं रणजीत सावरकर म्हणाले आहेत.

“राष्ट्रपिता ही संकल्पनाच मला मान्य नाही”

दरम्यान, आपल्याला राष्ट्रपिता ही संकल्पनाच मान्य नसल्याचं रणजीत सावरकर यांनी स्पष्ट केलं आहे. “मला वाटत नाही की गांधीजी देशाचे राष्ट्रपिता आहेत. हा देश ४०-५० वर्ष जुना नसून ५ हजार वर्ष जुना आहे. मला मुळात राष्ट्रपिता ही संकल्पनाच मान्य नाही. त्यामुळे सावरकरांना राष्ट्रपिता करण्याचा वगैरे मुद्दाच येत नाही”, असं ते म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ranjit savarkar in mahatma gandhi as father of nation rajnath singh comments pmw