India Corruption Ranking: ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने जाहीर केलेल्या २०२४ च्या भ्रष्टाचार निर्देशांकांनुसार, डेन्मार्कने सलग दुसऱ्या वर्षी जगातील सर्वात कमी भ्रष्ट देश म्हणून स्थान मिळवले आहे, त्यानंतर फिनलंड, सिंगापूर आणि न्यूझीलंडचा क्रमांक लागतो. दरम्यान, यामध्ये भारताच्या क्रमवारीत घसरण झाली असून, गेल्या वर्षीच्या ९३ व्या स्थानी असणारा भारत १०० पैकी ३८ गुणांसह आता ९६ व्या स्थानावर घसरला आहे. भारताला २०२३ मध्ये ३९ आणि २०२२ मध्ये ४० गुण मिळाले होते.

ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलचा निर्देशांक जगातील १८० देशांना अत्यंत भ्रष्ट ते भ्रष्टाचारमुक्त देश या प्रमाणात मोजतो. एखाद्या देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे प्रमाण संबंधित तज्ञ आणि व्यावसायिकांकडून मूल्यांकन केले जाते, ज्याच्या आधारे देशाला गुण दिले जातात.

जर आपण भारताच्या गेल्या १० वर्षांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर देशात भ्रष्टाचार वाढला असल्याचे पाहायला मिळत आहे. या क्रमवारीत २०१४ मध्ये भारत ८५ व्या स्थानावर होता, तर १० वर्षांत भारत ११ स्थानांनी घसरून ९६ व्या स्थानावर आला आहे.

२०१४ ते २०२४ दरम्यान, भारताची सर्वोत्तम कामगिरी २०१५ मध्ये होती जेव्हा देशाने ७६ वे स्थान मिळवले होते. पण, तेव्हापासून भारताचे स्थान सातत्याने घसरत आहे. यावरून असे दिसते की भारतात भ्रष्टाचार वाढला आहे.

पाकिस्तान कितव्या स्थानी?

भारताच्या शेजारी देशांमध्ये, चीनने सर्वोत्तम कामगिरी केली असून, ४३ गुणांसह ७६ व्या क्रमांकावर आहेत. पाकिस्तानच्या क्रमवारीबाबत बोलायचे झाले तर, २०२३ मध्ये ते १३३ व्या स्थानावर होते, परंतु ताज्या निर्देशांकात ते २ अंकांनी घसरून १३५व्या स्थानावर आले आहेत. गेल्या वर्षी २९ गुणांच्या तुलनेत २०२४ मध्ये पाकिस्तानला फक्त २७ गुण मिळाले आहेत. दुसरीकडे श्रीलंकेचा क्रमांक १२१ वा आहे तर बांगलादेशमध्येही भ्रष्टाचार वाढला असून, ते १४९ व्या स्थानावर आहेत.

कोणत्या देशात सर्वात कमी भ्रष्टाचार?

भ्रष्टाचार निर्देशांकात युरोपीयन देश डेन्मार्क अव्वल स्थानावर आहे, जिथे जवळजवळ भ्रष्टाचार नाही. निर्देशांकात डेन्मार्कला सर्वाधिक ९० गुण मिळाले आहेत. तर फिनलंड ८८ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. सिंगापूर ८४ गुणांसह तिसऱ्या स्थानावर असून, न्यूझीलंडने ८३ गुणांसह चौथे स्थान पटकावले आहे. दरम्यान, लक्झेंबर्ग ८१ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

सर्वात भ्रष्ट देश

दरम्यान, या भ्रष्टाचार निर्देशांकात दक्षिण सुदानला सर्वात भ्रष्ट देश म्हणून स्थान देण्यात आले आहे. त्यांना १०० पैकी केवळ ८ गुण मिळाले आहेत. त्यानंतर सोमालिया (९ गुण), व्हेनेझुएला (१० गुण), सीरिया (१२ गुण), लिबिया (१३ गुण), इरिट्रिया (१३ गुण), येमेन (१३ गुण) आणि इक्वेटोरियल गिनी (१३ गुण) यांचा क्रमांक लागतो.

Story img Loader