इस्रायल गाझा पट्टीत जे काही करीत आहे तो निव्वळ नरसंहार असून, त्याविरोधात संघर्ष करण्यासाठी पॅलेस्टिनींना शस्त्रपुरवठा करावा, असे आवाहन इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खोमेनी यांनी इस्लामी जगताला केले आहे.
‘इद उल फित्र’च्या निमित्ताने केलेल्या भाषणात खोमेनी यांनी इस्रायलची संभावना ‘जंगली लांडगा’ अशी केली. गाझा पट्टीत गेले तीन आठवडे सुरू असलेल्या हिंसाचारात १,१०० मुस्लिमांसह ५५ इस्रायली नागरिकही ठार झाले आहेत. ईदच्या पाश्र्वभूमीवर मृतांना श्रद्धांजली वाहण्याचे तसेच गाझा पट्टीतील अत्याचारग्रस्तांना पाठिंबा देण्याचे आवाहन त्यांनी जगभरातील मुस्लिमांना केले. हमासकडील शस्त्रास्त्रे काढून घेतल्यास पॅलेस्टिनी जनता शस्त्रहीन होऊन स्वत:चे संरक्षण करण्यास असमर्थ ठरेल. वास्तविक त्याऐवजी हमासला शस्त्रसज्ज करण्याची गरज आहे, असे आवाहन खोमेनी यांनी केले. पॅलेस्टिनमधील अतिरेकी गटांकडील शस्त्रास्त्रे काढून घेतल्यास तेथील हिंसाचार थांबेल, असे प्रतिपादन अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केले आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना खोमेनी यांनी हमासला आणखी शस्त्रपुरवठा करण्याचे आवाहन केले. तेहरानमधील इमाम खोमेनी मशिदीतील त्यांचे हे भाषण चित्रवाणी वाहिन्यांवरून त्याच वेळी सर्वत्र प्रसारित करण्यात आले. गाझा पट्टीतील जनता अविरत संघर्ष करीत आहे. अन्यायाचा प्रतिकार करीत आहे. सगळ्यांसाठीच हा धडा आहे, अशी कौतुकाची थाप खोमेनी यांना पॅलेस्टिनी जनतेच्या पाठीवर मारली. गाझा पट्टीतील युद्धविरामाची चर्चा ही निव्वळ थापेबाजी आहे. इस्रायल वाचवण्यासाठीचा अमेरिका आणि युरोपीय देशांचा हा डाव आहे, असा दावा त्यांनी केला. या भाषणानंतर तेहरानमधील इस्लामी देशांच्या राजदूतांबरोबरच्या बैठकीतही खोमेनी यांनी आपल्या आवाहनाचा पुनरुच्चार केला. दरम्यान, इराणचे अध्यक्ष हसन रुहानी यांचेही भाषण या कार्यक्रमात झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा