Ranveer Allahbadia : रणवीर अलाहाबादियाच्या वक्तव्याचे पडसाद संसदेतही उमटले आहेत. कारण हा विषय संसदेत चर्चेला येऊ आला. आता यावरुन विरोधक गदारोळ करणार आणि आरोपांच्या फैरी झाडताना काय म्हणणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तसंच आयटी विभागाचं संसदीय मंडळही यूट्युबर रणवीर अलाहाबादियाला नोटीस बजावू शकतं. तसंच संसदीय समितीनेही रणवीरला नोटीस बजावण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या नोटीसनंतर रणवीर अलाहाबादियाला संसदीय समितीने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. एवढंच नाही अशा प्रकारचा कंटेट युट्यूबने दाखवल्याप्रकरणी सरकारतर्फे त्यांच्यावरही कारवाई करण्याची शक्यता आहे.
खासदारांनी काय म्हटलं आहे?
दरम्यान रणवीरने केलेलं वक्तव्य हे अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया बीजू जनता दलाचे खासदार एम. पी. पात्रा यांनी केलं आहे. तसंच सरकारने रणवीरच्या विरोधात कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदींनीही शिवराळ भाषा वापरल्याबद्दल आणि अश्लीलता पसरवल्याबद्दल रणवीर अलाहाबादियावर कारवाई केली पाहिजे अशी मागणी केली आहे. अशा प्रकारची कॉमेडी आम्ही सहन करणार नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. शिवराळ भाषा असलेला तो व्हिडीओ कंटेट म्हणून उपलब्ध केला गेलाच कसा असाही प्रश्न चतुर्वेदींनी विचारला आहे. लोकसभेतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. नरेश म्हस्के यांनी रणवीर अलाहाबादियाच्या अश्लील वक्तव्याचा मुद्दा उपस्थित केला.
नरेश म्हस्केंनी काय म्हटलंं आहे?
रणवीर अलाहाबादियाने भारतीय संस्कृतीवर घाला घातला आहे. आई वडिलांच्या संदर्भात त्याने चुकीची वक्तव्यं केली. ओटीटी प्लॅटफॉर्मवर देवदेवतांच्या विरुद्धही बोललं जातं आहे. कारण तिथे कुठलाही सेन्सॉर नाही. राजकारणाबाबत वाट्टेल ते बोललं जातं आहे. ओटीटी बाबत कायदे आणले पाहिजेत. पॉडकास्टरवरही नियम असले पाहिजेत हा मुद्दा मी उपस्थित करतो आहे असं शिवसेना खासदार नरेश म्हस्केंनी म्हटलं आहे.
रणवीरने नेमकं काय म्हटलं होतं?
इंडिया गॉट लेटेंटमध्ये रणवीर अलाहाबादियाने एका स्पर्धकाला प्रश्न विचारला की तुला तुझ्या पालकांना आयुष्यभर सेक्स करताना पाहायला आवडेल की तुला त्यांच्याबरोबर सामील होऊन ते कायमचं थांबवायला आवडेल? त्याच्या या प्रश्नावर समय रैनाने सर्व त्याच्या पॉडकास्टचे रिजेक्ट झालेले प्रश्न असल्याचे म्हटले. रणवीरच्या याच प्रश्नामुळे त्याच्या अडचणी वाढल्या आहेत.
कोण आहे रणवीर अलाहाबादिया?
रणवीर अलाहाबादिया ( Ranveer Allahbadia ) हा प्रसिद्ध युट्यूबर असून तो ‘बीयरबाइसेप्स’ म्हणून देखील ओळखला जातो. त्याचा पॉडकास्ट शो सर्वाधिक चर्चेत असते. अनेक मान्यवरांनी त्याच्या पॉडकास्टला उपस्थिती लावली आहे. त्याने मुंबईतील ‘धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल’मधून शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर रणवीरने त्याचं उच्च शिक्षण ‘द्वारकादास जे सांघवी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग’ येथून पूर्ण केलं आहे. रणवीरने शाळेत असतानाच युट्यूब चॅनेल सुरू केलं होतं. तो एकूण तो ७ यूट्यूब चॅनेल चालवतो. ‘बीयरबाइसेप्स’ हे त्याचं युट्यूब चॅनेल चाहत्यांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय आहे. या चॅनेलचे तब्बल १२ मिलियन फॉलोअर्स आहेत.