Kannada actress Ranya Rao bail rejected in gold smuggling case : सोन्याच्या तस्करी प्रकरणात अटकेत असलेली कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला जामीन देण्यास आर्थिक गुन्ह्यांच्या विशेष न्यायालयाने नकार दिला आहे. रान्या रान हिच्यावर असलेले आरोप गंभीर स्वरुपाचे असल्याचे सांगत कोर्टाने जामीनाची याचिका फेटाळली आहे. यावेळी न्यायाधीश विश्वनाथ सी. गौदार यांच्या न्यायालयाने रान्या राव हिला न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात यावे या सरकारी वकिलांच्या मागणी मान्य केली.

रान्या राव हिला एका हाय प्रोफाइल सोने तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. यापूर्वी तिने मॅजिस्ट्रेट कोर्टात जामिनासाठी अर्ज केला होता जो फेटाळण्यात आला होता. त्यानंतर तिने आर्थिक गुन्ह्यांशी संबंधित विशेष न्यायालयात धाव घेतली मात्र येथे देखील तिची याचिका फेटाळण्यात आली आहे.

रान्याचा जामीन अर्जाला फेटाळल्यानंतर तिची कायदेशीर टीम सेशन्स कोर्टात जाण्याची तयारी करत आहे. मात्र जोपर्यंत जामीन अर्जावर निर्णय होत नाही तोपर्यंत रान्या राव हिला न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे.

अभिनेत्री रान्य राव हिला ४ मार्च २०२५ रोजी १४.८ किलोग्रॅम सोन्याची तस्करी करण्याच्या प्रयत्न करताना अटक करण्यात आली. या सोन्याची किंमत भारतात सुमारे १२ कोटी रुपये आहे. दुबई येथून कर्नाटकच्या बंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानताळावर उतरल्यानंतर तिला अटक करण्यात आली होती.

महसूल गुप्तचर संचालनालयाला (DRI) खास तयार करण्यात आलेल्या एका पट्ट्यात लपवण्यात आलेले सोने रान्या राव हिच्याकडून सापडले. त्यानंतर तिच्या बंगळुरू येथील निवासस्थानाची झडती घेण्यात आली आणि त्यात २.०६ कोटी रुपयांचे सोन्याचे दागिने आणि २.६७ कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. यामुळे रान्या रावकडून जप्त केलेली एकूण मालमत्ता १७.२९ कोटी रुपयांवर पोहोचली.

किती पैसे मिळत होते?

तपासात उघड झाले की, रान्या राव ही एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची सावत्र मुलगी असून तिने गेल्या वर्षभरात तब्बल ३० वेळा दुबईचा प्रवास केला आहे. ज्यामध्ये तिने मोठ्या प्रमाणात सोन्याची तस्करी केली. मिळालेल्या माहितीनुसार तस्करी करून भारतात आणलेल्या एक किलो सोन्याच्या मागे तिला एक लाख रुपये मिळत होते.

चौकशी दरम्यान रान्या रावने दावा केला की तिला एका अनोळखी क्रमांकावरून दुबई विमानतळावर कोणालातरी भेटण्याबाबत फोनवर सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच तिने युट्यूबवर व्हिडीओ पाहून सोने कसे लपवावे याबद्दल माहिती मिळवली.

तपासात असेही आढळून आले की तिचे सावत्र वडील पोलिस महासंचालक (डीजीपी) के. रामचंद्र राव यांनी एका कॉन्स्टेबलला तिला बेंगळुरू विमानतळावर प्रोटोकॉल टाळण्यास मदत करण्याचे निर्देश दिले होते.

या प्रकरणात ईडीने कर्नाटकमध्ये छापे छापेमारी देखील सुरू केली आहे. पोलिसांना हे एक आंतरराष्ट्रीय सोने तस्करी नेटवर्क असल्याचा संशय आहे.

तसेच तस्करीच्या प्रकरणाशी असलेल्या संबंधांचा तपास करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय)रान्या राव हिच्या लग्नातील फुटेज, पाहुण्यांच्या यादी आणि महागड्या भेटवस्तूंची तपासणी करत आहे.