Ranya Rao : दुबईतून बंगळुरुमध्ये परतत असलेल्या अभिनेत्रीला मागच्याच आठवड्यात अटक करण्यात आली. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून दाक्षिणात्य अभिनेत्री रान्या राव आहे. तिने आज न्यायालयात अधिकाऱ्यांवर विविध आरोप केले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री रान्या रावला बंगळुरुच्या कॅम्पेगौडा विमानतळावर मागच्या आठवड्यात अटक करण्यात आली. तिच्याकडून १४.८ किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे. या सोन्याची किंमत जवळपास १२ कोटी रुपयांहून अधिक आहे. रान्या रावने मागच्या वर्षभरात गल्फ देशांमधल्या १० तरी फेऱ्या केल्या आहेत. तसंच ५ मार्चच्या आधीच्या १५ दिवसांत ती चार वेळा दुबईला जाऊन आली. त्यामुळे ती तपास यंत्रणांच्या रडारवर आली. त्यानंतर तिच्यावर नजर ठेवण्यात आली. रान्या मंगळवारी जेव्हा दुबईहून बंगळुरुला पोहचली तेव्हा तिला पोलिसांनी आणि तपास यंत्रणांनी थांबवलं. तिच्या झडतीत पोलिसांना सगळं घबाड सापडलं. एवढंच नाही तर जतीन हुक्केरी हा रान्याचा पती आहे. तो प्रतिथयश आर्किटेक्ट आहे. त्याचं किंवा त्याच्याशी संबंधित कुणाचंही काम दुबईत सुरु नाही अशीही माहिती पोलिसांना मिळाली ज्यामुळे रान्या दुबईत तस्करीसाठी जात असावी असा संशय पोलिसांना आला. ज्यानंतर तिची झडती घेण्यात आली. त्यात तिच्याकडे १२ कोटींहून अधिक रकमेचं सोनं मिळालं. या प्रकरणी रान्या रावला अटक झाली. न्यायालयात गेल्यावर तिने रडायलाच सुरुवात केली.

न्यायालयात काय म्हणाली रान्या राव?

रान्या रावला कोर्टात आणल्यानंतर तिने जोरजोरात रडायला सुरुवात केली. डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटॅलिजन्स म्हणजेच DRI च्या अधिकाऱ्यांनी मला शिवीगाळ केली आणि माझा मानसिक छळ केला असा आरोप तिने कोर्टात केला आहे. न्यायालयाने आज तिचं म्हणणं ऐकून घेतलं. त्यानंतर DRI ने हे सांगितलं की असं काहीही घडलेलं नाही. रान्या राव तपासात कुठल्याही प्रकारे सहकार्य करत नाही. तस्करीच्या या प्रकरणात रान्या रावला न्यायालयाने २४ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

रान्या रावने DRI वर काय आरोप केले?

१) मला अधिकाऱ्यांकडून धमक्या दिल्या जातात. मी उत्तर दिलं नाही तर मला म्हणतात, तुला माहीत आहे ना तू जर जर बोलली नाहीस तर काय होईल?

२) मला मारहाण झालेली नाही. पण मला त्या अधिकाऱ्यांनी शिवीगाळ केली. त्यामुळे माझा मानसिक छळ झाला. मी अस्वस्थ झाले आहे. असं म्हणत रान्या राव न्यायालयातच रडू लागली.

न्यायाधीश रान्याला उद्देशून काय म्हणाले?

अभिनेत्री रान्याला न्यायाधीशांनी विचारलं की जेव्हा तुला ३० मिनिटांचा वेळ दिला होता आणि वकिलाशी बोलण्यास सांगितलं होतं तेव्हा तू हे सगळं काही तुझ्या वकिलास का सांगितलं नाहीस? तसंच या सगळ्याच्या उल्लेख तुझ्याकडून करण्यात आलेल्या याचिकेत का नाही? दरम्यान याबाबत डीआरआयला विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी हे आरोप फेटाळले आहेत.

डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी काय सांगितलं?

“रान्या रावची चौकशी आम्ही करतो तेव्हा ती कुठल्याही गोष्टीचं उत्तर देत नाही. आम्ही प्रश्न विचारतो तेव्हा ती गप्प बसते. आम्ही तिची चौकशी, तिला करण्यात आलेले प्रश्न तिने बाळगलेलं मौन हे सगळं रेकॉर्ड केलं आहे.” दरम्यान याबाबत रान्याच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की हे सगळे तेच व्हिडीओ आहेत ज्यात रान्या राव गप्प बसली आहे आणि अधिकारी काही बोलत नाहीत. अधिकाऱ्यांनी शिवीगाळ केल्याचा व्हिडीओ यात नाही. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीशांनी रान्या रावला २४ मार्च पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Story img Loader