Ranya Rao Gold Smuggling Case : कन्नड अभिनेत्री रान्या रावला ३ मार्च रोजी संध्याकाळी बेंगळुरू विमानतळावर अटक करण्यात आली. त्यावेळी तिच्याकडून १४.८ किलो सोने जप्त करण्यात आले होते. या सोन्याची किंमत जवळपास १२ कोटी असल्याचे सांगितले जाते. रान्या रावने मागच्या काही महिन्यात दुबईच्या अनेक वाऱ्या केल्या होत्या. त्यामुळे महसूल गुप्तचर संचालनालयने (DRI) तिच्या हालचालीवर नजर ठेवली होती. रान्या रावच्या अटकेनंतर सोनेतस्करीचे मोठे जाळे कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिने महसूल गुप्तवार्ता संचालनालयाच्या (डीआरआय) चौकशीमध्ये काही धक्कादायक खुलासे केले आहेत. तिने दिलेल्या माहितीनुसार, आपल्या शरीरावर सोने कसे लपवावे यासाठी तिने यु्ट्यूबवर व्हिडीओ पाहिल्याची कबुली दिली आहे. रान्या रावने सांगितले की, तिने पहिल्यांदा सोने भारतात आणण्यासाठी दुबईला जाण्याकरिता पतीच्या क्रेडिट कार्डचा वापर करून तिकिटे बुक केली होती.
सीएनएन-न्यूज १८ने दिलेल्या वृत्तानुसार, रान्या रावने युरोप, अमेरिका आणि आफ्रिकेत देखील पर्यटक म्हणून प्रवास केला होता. तिने डीआरआयला सांगितले की, फोटोग्राफीशी संबंधित कामे आणि रिअल इस्टेट एजंट म्हणून तिने अनेक वेळा मध्य पूर्वेतील देशांमध्ये प्रवास केला. दरम्यान काही दिवसांपूर्वी जेव्हा रान्या राव हिला विमानतळावर डीआरआय कडून झडती घेण्यासाठी नेण्यात आले. यावेळी रान्या रावने शरीरावर सोन्याचे बार लपवल्याची कबुली दिली आणि डीआरआय अधिकार्यांसमोर ते काढून दिले.
रान्या रावने डीआरआयला सांगितले की, तिची दुबई ट्रिप ही नियोजित नव्हती. तिने दावा केला की तिला १ मार्च २०२५ रोजी एक अनपेक्षित फोन आला, ज्यामध्ये तिला दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल ३, गेट ए येथे सोने ताब्यात घेण्यास सांगण्यात आले होते, जे तिला बेंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचवण्यास सांगण्यात आले होते.
सोनं कोणी दिलं?
दोन आठवड्यापूर्वीही तिला असेच कॉल येत होते, मात्र तिची प्रायव्हसी सुरक्षित राहावी म्हणून तिने याची तक्रार केली नाही, असे तिने डीआरआयला सांगितले. फोनवर अफ्रिकन-अमेरिकन एक्सेन्टमध्ये बोलणाऱ्या व्यक्तीने तिला गेट ए च्या डायनिंग लाउंजमधील एस्प्रेसो मशीनजवळ गाऊन घातलेल्या एका पुरूषाला भेटण्यास सांगितले. सुरक्षेनंतर तो व्यक्ती बंगळुरू येथे पोहोचवण्यासाठी तिला गोल्ड बार सोपवेल असे सांगितल्याचे तिने चौकशी दरम्यान सांगितले.
रान्या रावने वर्णन केल्यानुसार, तो व्यक्ती सहा फूट उंच आणि गव्हाळ रंगाच्या त्या व्यक्तीने पांढर्या रंगाचा गाऊन घातला होता. ताडपत्रीने गुंडाळलेले दोन पॅकेटे तिला देण्यात आली. यानंतर शौचालयात जाऊन तिने सोने चिकट टेप आणि टिश्यू पेपर वापरून लपवले. रान्याने सोने लपवण्याबाबत माहिती मिळवण्यासाठी यूट्यूब व्हिडिओ पाहिल्याचे कबूल केले आहे.
रान्या रावने डीआरआयला सांगितले की, सोने हे बिस्कीटांच्या स्वरुपात असेल आणि ते बंगळुरू येथे कोणाकडे द्यायचे याबद्दल माहिती तिला आधीच फोनवरून देण्यात आली होती. तिने सांगितले की, विमानतळ टोल गेटमधून सर्व्हिस रोडवरून बाहेर पडल्यानंतर ट्रॅफिक सिग्नलवर थांबलेल्या ऑटोमध्ये सोन्याचे बार ठेवण्याबद्दल तिला निर्देश देण्यात आले होते.
कर्नाटक सकारने रान्या राव सोन तस्करी प्रकरणात प्रोटोकॉलचे उल्लंघन झाल्याच्या प्रकरणातील सीआयडी तपास मागे घेतला आहे. तरासाचे आदेश जारी केल्यानंतर काही तासांमध्येच हा तपास मागे घेण्यात आला आहे. सरकारने यामागील कारण सांगताना स्पष्ट केले की, आयएएस अधिकारी गौरव गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली आधीपासूनच चौकशी सुरू असल्याने सीआयडी चौकशी स्थगित करण्यात आली आहे.
बेंगळुरूच्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर (केआयए) रान्या राव हिने केलेल्या प्रोटोकॉल उल्लंघनाची आणि सोन्याच्या तस्करी प्रकरणात तिचे डीजीपी वडील के रामचंद्र राव यांच्या संभाव्य भूमिकेची चौकशी करण्यासाठी सरकारने गुप्ता यांची नियुक्ती केली आहे
बेंगळुरू विमानतळावर सोन्याची तस्करी करताना आढळल्यानंतर रान्या रावला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर तिला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. दुबईहून खरेदी केलेल्या सोन्यावरील ४.८३ कोटी रुपयांचा कर चुकवल्याबद्दल रावला बेंगळुरू विमानतळावर अटक करण्यात आली होती. तसेच तिच्याकडून २.०६ कोटी रुपयांचे सोने आणि २.६७ कोटी रूपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली.