भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी  रावसाहेब दानवे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना राज्यातील भाजप मंत्र्यांचे संघटनात्मक प्रगतिपुस्तक तयार करण्याची जबाबदारी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सोपवली आहे.
महाराष्ट्रातील प्रत्येक भाजप मंत्र्याचा आढावा शहा घेणार आहेत. रावसाहेब दानवे यांना प्रदेशाध्यक्षपदासाठी हिरवा कंदील दाखवताना अमित शहा यांनी ही सूचना केली.  मंत्र्यांच्या कामाचा आढावा, पक्षवाढीसाठी मंत्र्यांचे प्रयत्न आदी मुद्दय़ावर हे प्रगतिपुस्तक  तयार करण्यात येईल. प्रदेशाध्यक्षपदाची घोषणा झाल्यानंतर दानवे-अमित शहा यांची भेट झालेली नाही. येत्या एक-दोन दिवसांत शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन केंद्रीय राज्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे दानवे यांनी सांगितले.
गेल्या दोन महिन्यांपासून रावसाहेब दानवे प्रदेशाध्यक्षपदासाठी मोर्चेबांधणी करीत होते. ‘मराठवाडा व मराठा’ या दोन्ही कार्डाचा वापर दानवे यांनी त्यासाठी केला. विशेष म्हणजे गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर दानवे यांनी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांच्याशी जुळवून घेत प्रदेशाध्यक्षपदाची मागणी पक्षश्रेष्ठींकडे केली होती. कामात स्वातंत्र्य नसल्याने दानवे यांना केंद्रीय राज्यमंत्रिपदात फारसा रस नव्हता. दानवे यांच्यावर अध्यक्षपद सोपवून केंद्रीय भाजपने मराठवाडय़ातील नेत्या पंकजा मुंडे-पालवे यांच्या वर्चस्वाला छेद देण्याचा प्रयत्न केला आहे. सूर्यभान वहाडणे यांच्यानंतर प्रदेशाध्यक्ष होणारे रावसाहेब दानवे हे दुसरे मराठा नेते आहेत.

भाजपच्या सदस्यता नोंदणी अभियानात दहा कोटी लोकांपर्यंत पोहोचायचे आहे. त्यापैकी महाराष्ट्रातून एक कोटी सदस्य नोंदविण्याचे मोठे आव्हान माझ्या व माझ्या चमूसमोर आहे.    – रावसाहेब दानवे

Story img Loader