बहुप्रतिक्षित केंद्रीय मंत्रीमंडळ विस्तार अखेर पार पडला असून एकूण ४३ मंत्र्यांचा शपथविधी राष्ट्रपती भवनामध्ये पार पडला. यामध्ये वेगवेगळ्या राज्यांना प्रतिनिधित्व देण्यात आलं असून महाराष्ट्राला ४ मंत्रिपदं देण्यात आली आहेत. मात्र, यामध्ये अगदी अलिकडेच पक्षात आलेले नारायण राणेंना थेट केंद्रीय मंत्रीपद देण्यात आल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. त्यामागे पक्षाच्या निष्ठावंतांची नाराजी असल्याचं देखील बोललं जात असताना नेमकं नारायण राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळा का घेण्यात आलं? याविषयी भाजपा खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी खुलासा केला आहे. एबीपीशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
नव्या-जुन्याचा मेळ…
नारायण राणेंच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील समावेशाविषयी रावसाहेब दानवे यांनी यावेळी सविस्तर भाष्य केलं. “पक्षात नवीन लोक यावेत असा पक्षश्रेष्ठींचा आग्रह असतो. ते नवीन असले, तरी त्यांच्यातल्याही काहींना प्रतिनिधित्व देणं हे गरजेचं असतं. नव्या-जुन्याचा मेळ घालून पक्ष वाढवावा लागतो. याच धोरणानुसार त्यांना पक्षात घेऊन मंत्रीपद दिलं जातं. सामाजिक समतोल राखण्याच्या दृष्टीने सगळ्यांना प्रतिनिधित्व द्यावं लागतं. राज्याच्या राजकारणात विभागाचा समतोल राखण्यासाठी आणि सर्वसमावेशक मंत्रिमंडळ दिसावं म्हणून या सगळ्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे”, असं दानवे यावेळी म्हणाले.
“राणेंच्या मंत्रीपदाचा शिवसेनेशी संबंध नाही”
दरम्यान, शिवसेनेला महाराष्ट्रात शह देण्यासाठीच नारायण राणेंचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, हा दावा रावसाहेब दानवे यांनी फेटाळून लावला आहे. “शिवसेनेचा मत्रिमंडळ विस्ताराशी काहीही संबंध नाही. त्यांना काय वाटतं याचा विचार करण्याची आम्हाला गरज नाही. नारायण राणे भाजपाचं काम करत आहेत. ते दुसऱ्या पक्षातून जरी आले असतील, तरी पक्षाचा ज्येष्ठ कार्यकर्ता म्हणून त्यांना पक्षानं न्याय दिलेला आहे. शिवसेनेला अंगावर घेण्यासाठी त्यांना मंत्रिमंडळात घेतलेलं नाही. शिवसेनाला तसं अनेकदा त्यांनी अंगावर घेतलं आहे. परतवून देखील लावलं आहे. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात घेण्याचा शिवसेनेला डिवचण्याशी काहीही संबंध नाही”, असं त्यांनी नमूद केलं.
मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राणेंनी मानले ‘या’ चार व्यक्तींचे आभार!
राजीनामे घेतले म्हणजे कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह नाही
ज्या १२ मंत्र्यांचे आज राजीनामे घेतले, ते कार्यक्षम नव्हते म्हणून घेतले नसल्याचं दानवेंनी यावेळी सांगितलं. “मंत्रीमंडळ फेरबदल करताना पंतप्रधानांना सर्व बाबींचा विचार करावा लागतो. सर्व राज्यांची परिस्थिती वेगळी असते. त्यात समतोल राखणं गरजेचं असतं. त्यामुळे ज्यांचे राजीनामे घेतले त्यांनी कारभार चांगला केला नव्हता म्हणून राजीनामे घेतलेले नाहीत. दर दोन-तीन वर्षांनी राज्याच्या राजकारणात फेरबदल करावे लागतात. त्यानुसार १२ मंत्र्यांना राजीनाम्याच्या सूचना दिल्या होत्या”, अशी माहिती रावसाहेब दानवेंनी दिली आहे.
Cabinet Expansion : केंद्रीय मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न! ४३ मंत्र्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ!
“मी राजीनामा दिलेला नाही”
शपथविधीच्या आधी इतर काही केंद्रीय मंत्र्यांप्रमाणेच रावसाहेब दानवे यांनी देखील राजीनामा दिल्याचं बोललं जात होतं. मात्र, आपण राजीनामा दिलेला नसल्याचं दानवेंनी स्पष्ट केलं आहे. “पक्षश्रेष्ठींचा निर्णय सगळ्यांना मान्य करावा लागतो. संजय धोत्रेंचा राजीनामा घेतल्यानंतर त्याच दरम्यान मी दिल्लीसाठी विमानात बसलो. त्यामुळे माध्यमांना वाटलं की माझाही राजीनामा होऊ शकतो. पण माझा राजीनामा पक्षानं मागितलाही नाही आणि तशी सूचनाही दिली नाही. त्यामुळे मोदींचा माझ्यावर विश्वास असल्याचं पुन्हा स्पष्ट झालं आहे”, असं ते म्हणाले.