ग्रामीण भागातील नागरिकांना आजही वैद्यकीय सेवेसाठी महानगरांकडे धाव घ्यावी लागते. खासगी रुग्णालयांमध्ये भरसमाट शुल्क. त्यामुळे रुग्णाला सरकारी रुग्णालयात उपचार करावे लागतात. सरकारी रुग्णालयात झटपट काम व्हायचे असले तर कुणाची तरी ओळख लागणारच! सरकारी यंत्रणेला कामाला लावण्यासाठी रुग्णाच्या नातेवाइकांना लोकप्रतिनिधींना विनवावे लागते. रुग्णाला सांभाळावे की लोकप्रतिनिधीकडे गाऱ्हाणे सांगावे अशा द्विधा मनस्थितीत असलेल्या भोकरदन तालुक्यातील वडशेदच्या लक्ष्मण आगलावे यांना भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या ‘ई-गव्हर्नन्स’चा दिलासा देणाराअनुभव आला.
वडिलांना ‘हार्ट अटॅक’ आल्याने उपचारासाठी लक्ष्मण आगलावे औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात आले. उपचार तातडीने सुरू होण्यासाठी घाटी रुग्णालयात फोन करा, अशी विनंती खा. दानवे यांना करण्यासाठी संपर्क साधण्याचा प्रयत्न आगलावे यांनी केला. संसद अधिवेशनात व्यस्त असल्याने सहा ते सात वेळा संपर्क करूनही दानवे फोनवर उपलब्ध झाले नाहीत. कुठून तरी आगलावे यांना दानवे यांच्या ‘मोबाइल अॅप’ची माहिती कळली. त्यावर तातडीने आगलावे यानी माहिती नोंदवली. ‘शिफारस करणाऱ्या कार्यकर्त्यांचे नाव’- या रकान्यात ‘स्वत’ असे लिहिले. ‘वडिलांना ‘हार्ट अटॅक’ आला आहे. आयसीयूत आहेत. (दानवे यांनी) डॉक्टरांना फोन करावा’ अशी ‘अपेक्षा’ मराठीत नोंदवली. स्वतचा विस्तृत पत्ता लिहिला. संबधित डॉक्टरांचा क्रमांकही दिला. ही सर्व माहिती ‘सबमिट’केली. अवघ्या तासाभरात आगलावे यांच्या वडिलावंर उपचार करण्यासाठी वरिष्ठ डॉक्टरांची धावपळ सुरू झाली. कारण ‘फोन’ आला होता. आगलावे यांना हा अनुभव सुखावणारा होता. ‘त्या’ फोननंतर वडिलांवर उपचारास गती आल्याची भावना आगलावे यांनी ‘दै. लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.
‘ई-गव्हर्नन्स’च्या ‘मास कनेक्टिव्हिटी’चा हा अनुभव! ज्यात उच्चविद्याविभूषित असू द्या नाही तर अशिक्षित. सर्वाना आपली समस्या लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचणे सहजसाध्य होताना दिसते. सिल्लोड तालुक्यातील चिंचपूर गावात कमी वीज दाबाने जळालेले वीज सयंत्र, शेतकऱ्यांना सलग १२ तास वीज द्या, जालना शहरातील रिक्षांना मीटर बसवा, अल्पवयीन मुले रिक्षाचालक आहेत, मृत शेतकऱ्याच्या नावावरील कर्ज स्टेट बँकेने माफ करावे, भोकरदन ते पारध रस्त्याचे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करावे यांसारखी असंख्य गाऱ्हाणी या ‘अॅप’वर येतात. याच धर्तीवर प्रदेश भाजपचे ‘महा बीजेपी’ अॅप विकसित करणार, असे दानवे यांनी सांगितले.
-टेकचंद सोनवणे, नवी दिल्ली
‘ई-गव्हर्नन्स’च्या माध्यमातून दानवेंची ‘कनेक्टिव्हिटी’
ग्रामीण भागातील नागरिकांना आजही वैद्यकीय सेवेसाठी महानगरांकडे धाव घ्यावी लागते. खासगी रुग्णालयांमध्ये भरसमाट शुल्क.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-01-2015 at 04:47 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raosaheb danves e governance connectivity