रशियातील एका तरुणाने काही दिवसांपूर्वी आपल्या प्रेयसीची निर्घृण हत्या केली होती. पीडित तरुणीने ब्रेक अप केल्याने आरोपीनं तिच्यावर बलात्कार केला आणि तब्बल साडेतीन तास तिचा अमानवी छळ केला. नराधम तरुण एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने धारदार शस्त्राने १११ वेळा वार करत तरुणीचा जीव घेतला. १७ वर्षांची शिक्षा झालेल्या या क्रूर मारेकऱ्याची रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सुटका केली आहे.
संबंधित दोषी आढळलेल्या तरुणाने युक्रेनविरुद्धच्या युद्धात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यामुळे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी त्याला माफी दिली आहे. व्लादिस्लाव कान्युस असं मारेकऱ्याचं नाव असून त्याला रशियातील न्यायालयाने १७ वर्षांची शिक्षा सुनावली होती. एक वर्षाहून कमी काळ तुरुंगात राहिल्यानंतर त्याची सुटका करण्यात आली आहे. या निर्णयाचा पीडित तरुणीच्या आईने निषेध केला असून दोषी कान्युसकडून तिच्याही जीवाला धोका असल्याचं तिने म्हटलं आहे. याबाबतचं वृत्त ‘द सन’ने दिलं आहे.
हेही वाचा- मुंबईत बड्या उद्योगपतीकडून अभिनेत्रीवर अनेकदा बलात्कार, गुन्हा दाखल
नेमकं प्रकरण काय?
‘द सन’च्या वृत्तानुसार, व्लादिस्लाव कान्युस याचे वेरा पेख्तेलेवा या तरुणीबरोबर प्रेमसंबंध होते. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर वेराने व्लादिस्लावशी ब्रेक अप केला. याचा राग मनात धरून व्लादिस्लावने वेराचा निर्घृण खून केला. त्याने लोखंडी तारेनं वेराचा गळा आवळला आणि धारदार शस्त्राने १११ वेळा वार केले. हत्येपूर्वी नराधमाने तिच्यावर बलात्कारही केला. एवढंच नव्हे तर तब्बल साडेतीन तास तिचा अमानवी छळ केला. दरम्यान, पीडितेच्या किंकाळ्या आणि आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी पोलिसांना सात वेळा फोन केला, पण पोलिसांनी त्यांचा फोन उचलला नाही.
हेही वाचा- नवी मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; १७ वर्षीय मुलगी निघाली मास्टरमाइंड, चौघींची सुटका
अशा गंभीर गुन्ह्यात दोषी आढळलेल्या तरुणाची व्लादिमीर पुतीन यांनी सुटका केली आहे. वेरा पेख्तेलेवाची आई ओक्साना यांनी मारेकऱ्याचा लष्करी गणवेशातील फोटो पाहिल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. याप्रकरणी तरुणीच्या आईने नाराजी व्यक्त करत संबंधित निर्णयाचा निषेध केला आहे.