केरळ पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा टँटू कलाकार सुजीश पीएस याला कोची येथून तो लपून बसलेल्या ठिकाणाहून अटक केली. एका मुलीने सोशल मीडियावर तिला टँटू स्टुडिओत आलेला वाईट अनुभव शेअर केल्यानंतर, हा टँटू आर्टिस्ट चार दिवसांपासून फरार झाला होता.
या वृत्ताला दुजोरा देताना कोचीचे पोलीस आयुक्त नागराजू चकीलम यांनी सांगितले की, त्याच्याविरुद्ध सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या आठवड्यात, एका १८ वर्षीय मुलीने सोशल मीडियावर टँटू स्टुडिओमध्ये तिला आलेला वाईट अनुभव सांगितला होता. त्यानंतर तो मागील चार दिवसांपासून फरार होता. त्याच्याविरोधात आणखी तक्रारी येण्याची पोलिसांची अपेक्षा असून विशेष तपास पथक तयार करण्यात येईल, अशी माहिती देखील पोलीस आयुक्तांनी दिली आहे.
“आम्ही आतापर्यंत सहा गुन्हे दाखल केले आहेत. आरोप झाल्यानंतर तो स्टुडिओ बंद करून फरार झाला होता. आमची टीम त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून होती आणि शनिवारी रात्री त्याचा माग काढण्यात यश आले.” असं पोलीस आयुक्तांनी सांगितलं.
मागील आठवड्यात सोशल मीडियावर एका १८ वर्षीय मुलीने “I can’t feel” या शीर्षकासह तिला टँटू स्टुडिओमध्ये आलेला वाईट अनुभव शेअर केला होता. त्यानंतर या प्रकरणातील आरोपांमध्ये वाढ झाली. त्या मुलीची पोस्ट अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देखील मोठ्या प्रमाणात शेअर केल्या गेली आणि त्याच व्यक्तीकडून करण्यात आलेल्या विनयभंग व गैरवर्तनाच्या तक्रारींची मालिकाच सुरू झाली. यानंतर पोलिसांनी शनिवारी त्याच्या स्टुडिओवर छापा टाकून लॅपटॉप, सीसीटीव्ही व्हिज्युअल आणि इतर रेकॉर्ड जप्त केले. त्याच्यावर भारतीय दंड संहिता (IPC) कलम ३७५ आणि कलम ५०९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सुरुवातीला अनेक पीडितांनी तक्रारी नोंदवण्यास नकार दिला पण नंतर आयुक्तांनी त्यांना सुरक्षितता आणि गोपनीयतेची खात्री दिल्यानंतर त्या पुढे आल्या.
तिची कटू कहाणी सांगताना पीडितेने सांगितले की, ती आठवडाभरापूर्वी टँटू काढण्यासाठी स्टुडिओत गेली होती. स्टुडिओत गर्दी असल्याने तिने थोडी अलिप्तता मागितली. टँटू बनवण्याचे काम सुरू असताना, आर्टिस्टने कथितपणे त्याच्या पुढील हालचाली सुरू केल्या आणि विरोध केल्यावर त्याने मणक्याला सुई टोचवून तिच्यावर बलात्कार केला, असा दावा तिने तिच्या पोस्टमध्ये केला आहे. “मला कधीच वाटलं नव्हतं की त्या माणसात असं काही करायची हिंमत असेल. मी एक शब्दही बोलले नाही. एवढ्या मूर्ख पणाबद्दल मला तिथेच मरावेसे वाटले. मला किळस वाटली,” असे तिने लिहिले आहे.