दिल्लीतील सामूहिक बलात्कारातील पीडित तरुणीच्या मृत्यूचा निषेध करण्यासाठी येथील २८ जणांनी सोमवारी रात्री  हाडे गोठवणाऱ्या बर्फाच्या पाण्यात डुबकी मारून तिच्या धैर्याला श्रद्धांजली वाहिली.
संपूर्ण जगात नववर्षांच्या स्वागताचा जल्लोष सुरू असताना शिलाँग येथील मैत सफरंग मूव्हमेंटच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीतील सामूहिक बलात्कारातील मृत युवतीला श्रद्धांजली वाहण्यासाठी अनोखी पद्धत अवलंबली. सध्या थंडीचा कडाका सुरू असताना एका तरणतलावात बर्फाच्या लाद्या टाकून पाण्याचे तापमान शून्य डिग्रीपर्यंत खाली आणण्यात आले. त्यानंतर या थंड पाण्यात लहान मोठय़ा अशा २८ व्यक्तींनी डुबकी मारून मृत तरुणीला श्रद्धांजली वाहिली. दिल्लीत चालत्या बसमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्काराची घडलेली घटना अतिशय निंदनीय आहे. पीडित मुलीने शेवटपर्यंत मृत्यूशी झुंज दिली. तिच्या या शौर्याला सलाम करण्यासाठी आम्ही थंड पाण्यात उतरून तिला श्रद्धांजली वाहिल्याचे संस्थेचे पदाधिकारी मायकेल सिएम यांनी सांगितले.
तरुणीचे नाव शाळेला देणार
दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरणातील मृत तरुणीने दाखवलेल्या धैर्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी तिच्या मूळ गावातील प्राथमिक शाळेला तिचे नाव देण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. मेडवार कलन गावचे प्रमुख शिव मंदिर सिंग यांनी सांगितले की, शाळेचे नामकरण करण्याचा निर्णय ग्रामस्थ आणि पीडित तरुणीच्या नातेवाईकांच्या सहमतीने घेण्यात आला आहे. शाळेला या तरुणीचे नाव देण्याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, मृत तरुणीच्या मातापित्यांनी गावात आपल्या मुलीचे स्मारक बांधण्याबाबतही मागणी केली आहे.