बिहारमधल्या महिलांच्या लैंगिक शोषण प्रकरणात सुरतची कंपनी असल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणात दोघांना मागच्या महिन्याभरात अटक करण्यात आली आहे. मुझ्झफरपूर या ठिकाणी लैंगिक शोषणाच्या घटना उघडकीस आल्या. या दोघांची चौकशी करण्यात आल्यानंतर आता सुरत कनेक्शन समोर आलं आहे. बिहारचं हे प्रकरण जॉब रॅकेटचा भाग असू शकतं असंही पोलिसांचं म्हणणं आहे.

पोलिसांनी काय सांगितलं आहे?

२ जून मुझफ्फरपूर पोलिसांनी नऊ लोकांविरोधात फसवणूक, बेकायदेशीर रित्या डांबून ठेनवणं, लैंगिक शोषण करणे या आधारे गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आत्तापर्यंत दोघांना अटक करण्यात आली आहे. लैंगिक शोषणाच्या या प्रकरणाचं सुरत कनेक्शन या दोघांच्या चौकशीनंतर समोर आलं आहे.

दोघांना करण्यात आली अटक

मुझफ्फरपूरचे पोलीस अधीक्षक अवधेश दीक्षित यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की “तिलककुमार सिंग आणि अजय प्रताप या दोघांना आम्ही अटक केली आहे. हे दोघंही डीबीआर युनिक कंपनीचे कर्मचारी आहेत. तिलक कुमारला लैंगिक शोषणाच्या आरोपांखाली अटक करण्यात आली आहे. तर अजय प्रतापला एका मुलीला मारहाण केल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.” पोलिसांनी असंही सांगितलं आहे की २०२२-२०२३ च्या कालावधीत हाजीपूर जिल्ह्यात असलेल्या कंपनीविरोधात किमान चार ते पाच गुन्हे दाखल करण्यात आले होते. नोकरी देतो असं सांगून पुरुष आणि स्त्रियांची फसवणूक केल्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती.

हे पण वाचा- सनदी लेखापालाकडून १९ वर्षीय तरुणीवर बलात्कार

लैंगिक शोषणाचं प्रकरण उघडीस कसं आलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सरण जिल्ह्यातल्या एका २३ वर्षांच्या तरुणीने हा आरोप केला आहे की ऑगस्ट २०२२ पासून डीबीआर युनिक कंपनीच्या हाजीपूर या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांसाठीच्या वसतिगृहात तिचं आणि साधारण १२ मुलींचं लैंगिक शोषण झाल आहे. या कंपनीचे प्रमुख मनिष सिन्हा उर्फ मनिष कुमार हे गोपालगंजचे रहिवासी आहेत. त्यांच्या कंपनीच्या गोपालगंज, हाजीपूर , पूर्व चंपारण या ठिकाणी शाखा आहेत. तक्रार करणाऱ्या या मुलीसह आणखी दोघांनी कंपनीच्या पदाधिकाऱ्यांवर पैसे घेतल्याचाही आरोप केला आहे. नोकरीचं आश्वासन देऊन पैसे घेण्यात आले आणि आम्हाला फसवलं असं या दोघांनी म्हटलं आहे. या प्रकारानंतर ही घटना उजेडात आली.

तक्रारदार महिलेने आणखी काय म्हटलं आहे?

तक्रारदार पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार अडीच वर्षांत लैंगिक अत्याचार आणि तीनदा गर्भपात झाल्याची तक्रार केली. पीडिता ऑगस्ट २०२२ मध्ये कंपनीच्या मुझफ्फरपूर कार्यालयात काम करु लागली होती. कंपनीने तिला २५ हजार रुपये प्रति महिना वेतन मान्य केलं होतं. तीन महिन्यानंतरही तिला पगार मिळाला नाही. तिने जेव्हा या गोष्टीचा पाठपुरावा केला तेव्हा तिला हे सांगण्यात आलं की तुला आम्ही प्रति महिना ५० हजार वेतन देऊ आणि बोनसही देऊ. मात्र तुला कंपनीसाठी ५० नवे लोक शोधावे लागतील ज्यांना नोकरीची गरज आहे. तसंच तिलक कुमार सिंगने आपल्याला लग्नाचं आमीष दाखवलं होतं आणि शारिरीक संबंध प्रस्थापित करण्यास भाग पाडलं असाही आरोप या तरुणीने केला. तरुणीचा जबाब नोंदवल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. या एफआयआरमध्ये आणखी दोन उल्लेख आहेत.

एफआयरच्या दोन उल्लेखांनुसार मिनापूरमधल्या २१ वर्षीय तर सरणमधील २२ वर्षीय तरुणींनी आरोप केला आहे की डीबीआर कंपनीतील कर्मचाऱ्यांनी आम्हाला मारहाण केली. मनिष कुमारचा शोध या प्रकरणात आम्ही घेत आहोत असंही पोलिसांनी म्हटलं आहे.

१४ मे २०२३ रोजी काय घडलं?

गेल्या वर्षी १४ मे रोजी झारखंडच्या दुमका या ठिकाणी एका महिलेचं लैंगिक शोषण झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तो गु्न्हा याच कंपनीविरोधात दाखल झाला होता. या प्रकरणात पीडितेच्या आईने तक्रार केली होती. पीडितेच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, “माझ्या मुलीला ४ मे २०२३ या दिवशी रक्सुअल येथील डीबीआर युनिक कंपनीने कामावर रुजू करुन घेतलं. कंपनीत तिने काम सुरु केल्यानंतर तिला माझ्याशी बोलण्याचीही मुभा नव्हती. १० मे २०२३ या दिवशी माझ्या मुलीने तिच्या मैत्रिणीच्या फोनवरुन मला फोन केला आणि कंपनीतले चार लोक माझ्यावर लैंगिक अत्याचार करत आहेत ही बाब सांगितली.” यानंतर रक्सुअल पोलिसांनी या मुलीची सुटका केली. तसंच पाच जणांविरोधात लैंगिक अत्याचार, बेकायदेशीरित्या ताब्यात ठेवणं आणि छळ करणं या गुन्ह्यांच्या अन्वये गुन्हा दाखल केला होता. आता याच कंपनीचं सुरत कनेक्शन समोर आलं आहे.