बलात्काराच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेला डेरा सच्चा सौदाचा प्रमुख राम रहीम सध्या ४० दिवसांच्या पॅरोलवर बाहेर आहे. दरम्यान, त्याने पॅरोल मिळल्याच्या आनंदात थेट तलवारीने केक कापल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. यावरून अनेकांनी हरियाणा सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
राम रहीम सध्या बलात्काराच्या आरोपाखाली रोहतक जेलमध्ये शिक्षा भोगत आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने डेरा सच्चा सौदाचे माजी प्रमुख शाह सतनाम सिंह यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित राहण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी अर्ज केला होता. दरम्यान, रोहतक न्यायालयाने शनिवारी पॅरोल मंजूर केला. पॅरोल मंजूर होताच, तो थेट बागपत येथील त्याचा आश्रमात पोहोचला. यावेळी त्याने तलवारीने केक कापून पॅरोल मिळाल्याचा आनंद साजरा केला. यावेळी त्याचे भक्तदेखील उपस्थित होते. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे.
दरम्यान, यापूर्वीही हरियाणातील आदमपूर विधानसभा पोटनिवडणूक आणि पंचायत निवडणुकीपूर्वीही राम रहीमला ४० दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला होता.