ब्रह्मज्ञानी माणसाने मुलीचे लैंगिक शोषण केले तर ते पाप ठरत नाही असे आसाराम बापूचे मत होते. स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापू विरोधात खटला चालू असताना फिर्यादी पक्षाच्या साक्षीदारने कोर्टाला हे सांगितले. अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरणात दोषी ठरलेल्या आसाराम बापूला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आसाराम लैंगिक क्षमता वाढवण्यासाठी औषधांचेही सेवन करायचा असे फिर्यादी पक्षाचा साक्षीदार राहुल के साचारने कोर्टाला सांगितले.
न्यायालयाच्या ४५३ पानाच्या निकालपत्रात हे सर्व मुद्दे नमूद केले आहेत. एकेकाळी आसारामचा विश्वासू असलेल्या राहुल साचारला आसारामच्या कुटियामध्ये थेट प्रवेश होता. २००३ साली मी राजस्थान, हरयाणा आणि अहमदाबाद येथील आश्रमात आसारामला मुलींचा विनयभंग करताना पाहिले होते असे राहुलने साक्ष देताना सांगितले.
आसाराम टॉर्च लाईट मारुन त्याचे सावज हेरायचा. आसारामसोबत तीन मुली असायच्या. त्यांच्यावर निवडलेल्या मुलीला कुटियापर्यंत आणण्याची जबाबदारी सोपवलेली होती. मुलगी निवडण्यासाठी तो या तीन मुलींसोबत आश्रम परिसरात फिरायचा असे साचारने सांगितले. एका संध्याकाळी अहमदाबादमधल्या आश्रमात मी कुटिया जवळच्या भिंतीवर चढून आसारामला मुलीचा विनयभंग करताना पाहिले होते असे साचारने सांगितले. त्यानंतर आसाराम मुलींसोबत असा का वागतो ? म्हणून मी पत्र लिहिले आणि ते पत्र आचाऱ्याला दिले पण आसारामने ते पत्र वाचून दुर्लक्ष केले असे राहुलने सांगितले.