बलात्कार प्रकरणात आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर पिडीत महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. उत्तर प्रदेशच्या गोंडा जिल्ह्यातील कैरनलगंजमध्ये ही घटना घडली. ३५ वर्षीय पिडीत महिलेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी व्यवस्थित तपास न केल्यामुळे आपल्या पत्नीला न्याय मिळाला नाही. पोलिसांनी तपासात दुर्लक्ष केल्याचा आरोप पिडीत महिलेच्या पतीने केला.
आरोपींनी फक्त बलात्कारच केला नाही तर त्यांनी व्हिडिओ क्लिप सुद्धा बनवली होती. पोलिसांनी आरोपींना क्लिन चीट दिल्यामुळे आपली पत्नी खूप निराश झाली होती. त्यातूनच तिने आत्महत्येचे पाऊल उचलले असे पिडीत महिलेच्या पतीने सांगितले. जिल्हा पोलिसांकडून दोन्ही आरोपींना क्लिन चीट मिळाल्यानंतर पिडीत महिलेने १५ दिवसांनी आत्महत्या केली.
पिडीत महिला दोन मुलांची आई आहे. दोन्ही आरोपी कैरनलगंजमध्ये राहणारे आहेत. आरोपी शंकर दयाळ आणि त्याचा भाऊ अशोक कुमारने मागच्यावर्षी ऑगस्ट महिन्यात अनेकवेळा आपल्यावर बलात्कार केला असा आरोप पिडीत महिलेने केला होता. आधी स्थानिक पोलीस आणि नंतर जिल्हा गुन्हे शाखेने तपास केला. दोन्ही तपासामध्ये पोलिसांनी आरोपींना क्लीन चीट दिली होती. दोन्ही आरोपी आता फरार असून या प्रकरणी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.