कर्नाटकमध्ये सध्या महाविद्यालयात हिजाब घालण्यावरून मोठा वाद सुरू आहे. या प्रकरणावर देशभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. या वादातच आता काँग्रेस नेत्याने एक वादग्रस्त विधान केलं आहे. राज्य काँग्रेसचे नेते जमीर अहमद यांनी रविवारी दावा केला की भारतात सर्वाधिक बलात्काराच्या घटना नोंदल्या जातात कारण महिला “पर्दा” करत नाहीत किंवा चेहरा झाकत नाहीत.
एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अहमद असे म्हणताना दिसत आहेत की, “मुली मोठ्या झाल्यावर, त्यांचे सौंदर्य लपवण्यासाठी त्यांना ‘पर्दा’ म्हणजेच बुरख्यामागे ठेवणे, त्यांचे सौंदर्य दिसू नये ही हिजाबची संकल्पना आहे. मला वाटतं जगात सर्वाधिक बलात्काराच्या घटना भारतात होतात. कारण स्त्रिया ‘पर्दा’ करत नाहीत.” “हिजाब घालणे सक्तीचे नाही आणि वर्षानुवर्षे ही प्रथा आहे,” असंही त्यांनी सांगितलं.
कर्नाटकच्या काही भागात हायस्कूल आणि कॉलेज कॅम्पसमध्ये हिजाबवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अहमद यांचं हे वक्तव्य आहे. जानेवारीमध्ये जेव्हा हिजाब घातलेल्या सहा मुलींना उडुपी येथील प्री-युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये प्रवेश नाकारण्यात आला तेव्हा वाद सुरू झाला. विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या गणवेश धोरणाला विरोध केला असता काही विद्यार्थिनी भगवे स्कार्फ घालून बाहेर पडल्या.
या घटनांमुळे तणाव, अनुचित घटना आणि काही ठिकाणी हिंसक वळण देखील लागलं. हे प्रकरण आता कर्नाटक उच्च न्यायालयात प्रलंबित आहे.