कर्नाटकमधील बंगळुरू येथे एक विचित्र घटना घडली आहे. येथील एका ‘रॅपिडो’ चालकाने एका प्रवासी तरुणीबरोबर विकृत कृत्य केलं आहे. आरोपीनं पीडित महिलेला घेऊन जात असताना धावत्या दुचाकीवर हस्तमैथुन केलं आहे. एवढंच नव्हे तर राइड संपल्यानंतरही आरोपीनं पीडितेला व्हॉट्सअॅपवर अश्लील मेसेज आणि फोन करत लैंगिक छळ केला आहे. याप्रकरणी आरोपी रॅपिडो चालकाला अटक केली आहे.
पीडित महिलेनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी रॅपिडो चालकाला अटक केली आहे. याबाबतचा संपूर्ण घटनाक्रम पीडित तरुणीने ट्विटरवर लिहिला आहे. आरोपीने व्हॉट्सअॅपवर पाठवलेल्या मेसेजेसचा स्क्रीनशॉटही तिने शेअर केला आहे. अथिरा पुरुषोथमन असं पीडित तरुणीचं नाव आहे. शुक्रवारी ‘रॅपिडो बाईक-टॅक्सी’ची सेवा वापरल्यानंतर तिचा छळ करण्यात आला, असा आरोप तिने केला आहे.
अथिराने ट्वीटमध्ये लिहिलं, “शुक्रवारी मी मणिपूरमधील हिंसाचाराविरोधातील आंदोलनासाठी टाऊन हॉलमध्ये गेले होते. तिथून घरी परत येण्यासाठी मी रॅपिडो बाईक बूक केली. पण दुचाकीस्वाराने रॅपिडो मोबाईल ऍप्लिकेशनवर नोंदणीकृत असलेल्या बाईकऐवजी वेगळी बाईक आणली. बाईकबद्दल विचारलं असता नोंदणीकृत बाईक दुरुस्त करायला टाकली आहे, असं त्याने उत्तर दिलं.”
हेही वाचा- धावत्या बसमध्ये कंडक्टरचा प्रवासी तरुणीबरोबर सेक्स, गैरवर्तनाचा VIDEO व्हायरल
“प्रवासादरम्यान आम्ही निर्मनुष्य ठिकाणी पोहोचलो. यावेळी रॅपिडो दुचाकीस्वार एका हाताने दुचाकी चालवू लागला आणि दुसऱ्या हाताने अश्लील कृत्य (धावत्या दुचाकीवर हस्तमैथुन) करू लागला. पण सुरक्षिततेच्या कारणास्तव मी शांत बसले. त्यानंतर मी त्याला घरापासून २०० मीटर अंतरावर थांबायला सांगितलं. राइट संपल्यानंतर त्याने मला व्हॉट्सअॅपवर अनेक कॉल आणि अश्लील मेसेज करायला सुरुवात केली. याप्रकारानंतर मी त्याचा नंबर ब्लॉक केला,” असं अथिराने ट्वीटमध्ये म्हटलं.
यावेळी तिने आरोपीनं व्हॉट्सअॅपवर पाठवलेल्या संदेशांचा स्क्रीनशॉट ट्विटरवर पोस्ट केला आहे. तरुणीच्या ट्विटर पोस्टनंतर पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला. तसेच आरोपीला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास बंगळुरू पोलीस करत आहेत.