चीनमधील एका महिलेला दुर्मिळ आजार झाला आहे. या आजारामुळे तिच्या श्रवणयंत्रणेवर परिणाम झाला असून तिला पुरुषांचे आवाज ऐकू येणे बंद झाले आहे. या आजारामध्ये खोल म्हणजेच जाड स्वरातील आवाज ऐकू येणे बंद होते.

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार चीनमधील झियामेन प्रांतात राहणारी चेन ही तरुणी सकाळी झोपेतून उठली असता तिला तिचा प्रियकर काय बोलतोय हेच ऐकू येत नव्हते. मात्र त्याचवेळी तिला इतर गोष्टींचे आवाज स्पष्टपणे ऐकू येत होते. आपल्यासोबत काय होत आहे हेच चेनला समजत नव्हते. चेनने लगेचच क्विआनपू शहरामधील हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. त्यावेळी डॉक्टरांनी तिच्या कानाची तपासणी केली असता तिला केवळ पुरुषांचे आवाज ऐकू येत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

वैद्यकीय भाषेत सांगायचे झाले तर चेनला रिव्हर्स स्लोप हियरिंग लॉस हा आजार झाला आहे. या आजारामध्ये व्यक्तीला कमी फिक्वेन्सीचा आवाज ऐकू येत नाही. डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, चेनवर उपचार करणाऱ्या कान, नाक, घसा तज्ञ असणाऱ्या डॉ. लेन झिओकिन म्हणाले की ‘मी जेव्हा चेनशी बोललो तेव्हा तिला माझा आवाज ऐकू येत होता. मात्र जेव्हा तरुण पुरुष रुग्ण तिच्याशी बोलू लागला तेव्हा तिला काहीच ऐकू येत नव्हते.’ ‘ज्या सकाळी हा प्रकार घडला त्याआधीच्या रात्री झोपण्यापूर्वी माझ्या कानामध्ये घंटानाद होत असल्याचा भास झाला. मात्र कमी झोप झाल्यामुळे असं होत असल्याचे मला वाटल्याने मी त्याकडे दुर्लक्ष केले, अशी माहिती चेनने दिली.

चेनला ही समस्या का येत असावी याबद्दल बोलताना लेन यांनी ‘तणाव तसेच अती कामामुळे थकवा आल्याने चेनबरोबर असे झाले असावे’ असं मत व्यक्त केलं आहे. चेन मागील काही दिवसांपासून रात्री उशीरापर्यंत जागून काम करत होती. तसेच आता हा आजार झाल्याचे समजल्यानंतर याबद्दलचा मानसिक ताणही तिला आला असल्याचे लेन म्हणाले. मात्र हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो असं लेन म्हणाले असून त्यामुळे चेनला थोडा दिलासा मिळाला आहे.

रिव्हर्स स्लोप हियरिंग लॉस म्हणजे काय

ऑडीओलॉजी इंटरनॅशनलच्या माहितीनुसार रिव्हर्स स्लोपी हियरिंग लॉस हा एक दुर्मिळ आजार आहे. अमेरिका आणि कॅडनामध्ये केवळ तीन हजार जणांना आत्तापर्यंत हा आजार झाला आहे. या आजारामध्ये कमी फिक्वेन्सीचे आवाज ऐकू येणे बंद होते. कानावर अचानक येणारा दबाव आणि त्याचा कानातील अंतर्गत भागावर होणारा परिणाम यामुळे हा आजार कोणतीही मेडिकल हिस्ट्री नसताना अचानकच होऊ शकतो. हा आजार झालेल्यांना विजांचा आवाज किंवा फ्रिजचा आवाजही ऐकू येत नाही. या लोकांना जाड स्वरातले आवाज ऐकण्यास अडचणी येतात त्यामुळेच रस्त्याने चालताना येणाऱ्या गाडीचाही आवाज त्यांना ऐकू येत नाही. म्हणूनच या आजाराच्या रुग्णांनी कोणत्याही मदतीशिवाय रस्त्यांवर फिरणे धोकादायक ठरु शकते.

Story img Loader