पुष्पा, ॲनिमल अशा चित्रपटातून संपूर्ण देशभरात प्रसिद्ध झालेली दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेत्री रश्मिका मंदानाला नॅशनल क्रश म्हटले जाते. रश्मिका मंदानाने काही दिवसांपूर्वी मुंबईतील अटल सेतून पुलाचे कौतुक करणारा एक व्हिडीओ तयार करून सोशल मीडियावर प्रसिद्ध केला. तसेच या पुलाचे आणि तो तयार करणाऱ्या सरकारचे तोंडभरून कौतुक केले. रश्मिकाच्या पोस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केले आहे. मात्र आता रश्मिका मंदानावर जोरदार टीका होत आहे. नॅशनल क्रश ही नॅशनॅलिस्टही आहे, हे यानिमित्तान समजले, असे काही लोक म्हणत आहेत. तर केरळ काँग्रेसने हा व्हिडीओ ईडीने दिग्दर्शिक केलेली जाहीरात आहे, असे म्हटले आहे.

रश्मिका मंदानाने शेअर केलेला व्हिडीओ हा निवडणुकीची जाहिरात वाटावी, असा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांनी यावरून टीका केली. अटल सेतूमुळे दोन तासांचा प्रवास आता फक्त २० मिनिटांत होत आहे, असे रश्मिका मंदानाने या व्हिडीओत म्हटले आहे. तसेच देशातील हा सर्वात पहिला समुद्रावरील पूल असल्याचेही तिने म्हटले. यावरून केरळ काँग्रेसने वांद्रे-वरळी सी लिंक आणि अटल सेतूची तुलना करणारी आकडेवारी सादर करून रश्मिका मंदानावर टीका केली.

केरळ काँग्रेसने काय म्हटले?

केरळ काँग्रेसने केलेल्या एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले, “प्रिया रश्मिका मंदानाजी, देशाने या आधी पैसे देऊन केलेल्या छुप्या जाहिराती, खोट्या जाहिराती पाहिल्या आहेत. मात्र ईडीने दिग्दर्शित केलेली ही पहिलीच जाहिरात आहे. जाहिरात चांगली झालीये, अभिनंदन. पण तुमच्या जाहिरातीमध्ये अटल सेतू पूर्ण रिकामा असल्याचे दिसत आहे. त्यामुळे आम्ही मुंबईतील काँग्रेस सहकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी सांगितले की, अटल सेतू पेक्षा राजीव गांधी वांद्रे – वरळी सी लिंकवर अधिक वाहतूक असते.” यासह केरळ काँग्रेसने वांद्रे-वरळी सी लिंकवरील एक व्हिडीओही शेअर केला आहे. ज्यामध्ये सी लिंकवर अधिक वाहने असल्याचे दिसते.

केरळ काँग्रेसने या खाली आणखी दोन पोस्ट टाकल्या आहेत. ज्यामध्ये दोन्ही पुलाची तुलना करण्यात आली आहे. ५.६ किमीच्या वांद्रे-वरळी सी लिंकचा बांधकामाचा खर्च १,६३४ कोटी असून २००९ साली हा पूल वाहतुकीसाठी खुला झाला. मार्च २०२२ या एकाच महिन्यात पूलाचा महसूल ९.९५ कोटी इतका होता, अशी माहिती एमएसआरडीसीच्या हवाल्याने देण्यात आली आहे.

तिसऱ्या पोस्टमध्ये अटल सेतूची माहिती देण्यात आली आहे. अटल सेतूच्या निर्मासाठी १७,८४० कोटी रुपये खर्च झाले. तर एका बाजूच्या वाहतुकीसाठी इथे २५० रुपये टोल द्यावा लागतो. उदघाटन झाल्यापासून १०२ दिवसांत केवळ २२.४७ कोटींचा महसूल गोळा झाला आहे. याच गतीने महसूल मिळाला तर पुलासाठी केलेला खर्च वसूल करण्यासाठी २२५ वर्षांचा कालावधी लागेल, अशी टीका केरळ काँग्रेसने केली आहे.

मुंबईक अटल सेतूपेक्षा वांद्रे-वरली सी लिंकला अधिक पसंती देत आहेत. असे का होत असेल? याचाही तुम्ही एक व्हिडीओ तयार कराल का? असे आव्हान केरळ काँग्रेसने अभिनेत्री रश्मिका मंदानाला दिले आहे.

२०२० साली झाली होती प्राप्तिकर विभागाची कारवाई

रश्मिक मंदानाच्या घरी २०२० साली प्राप्तिकर विभागाची धाड पडली होती. बेहिशेबी मालमत्तेचा आरोप करत तिची चौकशी करण्यात आली होती. रश्मिका मंदाना ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे, अशी जोरदार चर्चा असताना ही धाड टाकण्यात आली होती. या धाडीनंतर हाती काय लागले, याची माहिती प्राप्तिकर विभागाने दिली नाही किंवा रश्मिका मंदानाचीही त्यावर प्रतिक्रिया आली नव्हती. मात्र मी सर्वाधिक मानधन घेते, ही अफवा असल्याचे तिने स्पष्ट केले होते. याचाच आधार घेऊन केरळ काँग्रेसने रश्मिका मंदानाचा व्हिडीओ ईडीकडून दिग्दर्शित करण्यात आल्याचे म्हटले आहे.