एपी, कीव्ह : काळय़ा समुद्रातील रशियाच्या आरमारातील आघाडीची युद्धनौका आपल्या फौजांनी बुडवल्याचा दावा युक्रेनने गुरुवारी केला. तथापि, या युद्धनौकेचे केवळ नुकसान झाले असल्याचे सांगताना रशियाने त्याच्यावरील हल्ल्याचा उल्लेख केला नाही. युक्रेनची राजधानी कीव्हसह उत्तरेकडील बहुतांश भागांतून माघार घेतल्यानंतर रशियन फौजा पूर्व युक्रेनमध्ये नव्याने आक्रमणाची तयारी करत असताना, युद्धनौका गमावणे हा रशियासाठी मोठा लष्करी व प्रतीकात्मक पराभव ठरणार आहे.

सामान्यत: ५०० नौसैनिक असणाऱ्या ‘मॉस्कोव्हा’ जहाजावर आग लागल्याने, सर्व नाविकांना हे जहाज रिकामे करणे भाग पडले, असे रशियाने सांगितले. ही आग आटोक्यात आली असून, दिग्दर्शित क्षेपणास्त्र शाबूत असलेले हे जहाज आता बंदरावर वाहून आणले जाईल, असेही त्याने सांगितले. ही युद्धनौका १६ क्षेपणास्त्रे वाहून नेते आणि ती नौसेनेच्या ताफ्यातून काढून घेतल्यामुळे रशियाची काळय़ा समुद्रातील अग्निक्षमता मोठय़ा प्रमाणात कमी होईल, असे एका लष्करी विश्लेषकाचे म्हणणे आहे. युद्धनौकेचे नुकसान किती झाले हे महत्त्वाचे नसून, सात आठवडे सुरू असलेल्या युद्धात रशियाच्या प्रतिष्ठेला हा मोठा धक्का असल्याचे मानले जाणार आहे.

युक्रेन व रशियाच्या वेगवेगळय़ा दाव्यांची खातरजमा लगेचच करणे शक्य झाले नाही. ढगांच्या आवरणामुळे उपग्रह प्रतिमांच्या आधारे या युद्धनौकेचे ठिकाण शोधणे किंवा तिची अवस्था ठरवणे शक्य झाले नाही. अडचणीत सापडलेल्या युक्रेनला त्याच्या मित्रदेशांनी नव्याने पाठिंबा जाहीर केल्यानंतर काही तासांतच युद्धनौकेच्या नुकसानीची बातमी आली आहे. दरम्यान, रशियाच्या युक्रेनमधील कारवाया या ‘नरसंहार’ असल्याचे या आठवडय़ात सांगणारे अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनला ८०० दशलक्ष डॉलरची लष्करी मदत मंजूर केली आहे.

युक्रेनतर्फे अमेरिकेचे आभार

अमेरिकेने नव्याने केलेल्या ८०० दशलक्ष डॉलरच्या मदतीसाठी आपण त्यांचे ‘हार्दिक आभारी’ असल्याचे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. पोलंड, इस्टोनिया, लिथुआनिया व लॅटव्हिया या देशांच्या अध्यक्षांनी बुधवारी युक्रेनला दिलेल्या भेटीबद्दलही झेलेन्स्की यांनी त्यांच्या रोज रात्रीच्या देशाला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांचे आभार मानले. या नेत्यांनी पहिल्या दिवसापासून आम्हाला मदत केली आहे, आम्हाला शस्त्रे देण्यात मागेपुढे पाहिले नाही, निर्बंध लागू करावेत की नाही यावर त्यांनी कधीही शंका घेतली नाही, असा झेलेन्स्की यांनी उल्लेख केला. अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांच्यासोबतच्या दूरध्वनी संभाषणात आपण नव्याने शस्त्रांचा पुरवठा, रशियाविरुद्ध आणखी कठोर निर्बंध आणि युक्रेनमध्ये युद्ध गुन्हे करणाऱ्या रशियन सैनिकांविरुद्ध कारवाई करण्याचे प्रयत्न याबाबत चर्चा केल्याचेही झेलेन्स्की म्हणाले. माघार घेणाऱ्या रशियन सैनिकांनी उत्तर युक्रेनमध्ये मागे ठेवलेले हजारो स्फोट न झालेले तोफगोळे व सुरुंग निकामी करण्याचे काम सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.