पाकिस्तानवर हवाई हल्ला करुन तेथील दहशतवादी तळ उद्धवस्त करणाऱ्या भारतीय हवाई दलाला प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा उद्योग समुहाचे मालक रतन टाटा यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मंगळवारी पहाटेच्या सुमारास बालाकोट येथे हवाई हल्ले करुन जैश-ए-महम्मदचे तळ उद्धवस्त केले. संपूर्ण देशाला भारतीय हवाई दलाचा मला अभिमान आहे अशा शब्दात रतन टाटा यांनी हवाई दलाच्या शूर जवानांचे पाठ थोपटली आहे. विशेष म्हणजे या ट्विटमध्ये टाटा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही कौतूक केले आहे.
भारताने पाकिस्तानवर एअर स्ट्राइक केल्यापासून अनेकांनी आपल्या हवाई दलाचे अभिनंदन केले आहे. याच संदर्भात रतन टाटा यांनीही आज पहाटेच्या सुमारस एक ट्विट केले. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात, ‘पाकिस्तानमध्ये असलेल्या दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला करून आपण ती उद्ध्वस्त केली याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय वायुदलाचं अभिनंदन. आपल्या देशात दहशतवादी नाही असं पाकिस्तानकडून वारंवार सांगितले जात होते. काही दिवसांपूर्वी (पुलवामा येथे) आपल्या जवानांवर झालेल्या हल्ल्याचे चोख प्रत्युत्तर देणाऱ्या भारतीय हवाई दलाचा संपूर्ण देशाला अभिमान आहे.’ या ट्विटच्या शेवटी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विटर हॅण्डलही टॅग केले आहे.
We congratulate the PM and the IAF for the successful air strikes on the terrorist training camps which Pakistan has claimed never existed! India is proud of the firm action taken in retaliation to the suicide attack on our soldiers a few days ago. @narendramodi
— Ratan N. Tata (@RNTata2000) February 26, 2019
दरम्यान काल (२६ फेब्रुवारी) भारताने हवाई हल्ला केल्यानंतर आज (२७ फेब्रुवारी) दिवसभरामध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत. भारतीय हवाई दलाचे एक विमान बुधवारी सकाळी पाकिस्तानच्या हद्दीत कोसळले होते. या विमानाच्या वैमानिकाला जिवंत पकडल्याचा दावा पाकने केला होता. भारतानं मात्र वैमानिक बेपत्ता असल्याच्या वृत्ताला केवळ दुजोरा दिला आहे. भारतीय हवाई दलाचे अधिकारी आर जी के कपूर आणि परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे.