Industrialist Ratan Tata Died at 86 : ज्येष्ठ उद्योजक आणि टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा ( Ratan Tata ) यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना बुधवारी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपाचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूनंतर राजकीय विश्वात, उद्योग विश्वात तसंच मनोरंजन विश्वात हळहळ व्यक्त होते आहे. आपल्या कारकिर्दीत रतन टाटांनी अनेकांची आयुष्य समृद्ध केली. उत्तम व्यावसायिक आणि उत्तम देशभक्त काय असतो? याचं उदाहरण म्हणजे रतन टाटा ( Ratan Tata ) होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रतन टाटांच्या निधनाविषयी प्रतिक्रिया देत सहवेदना व्यक्त केल्या आहेत.

काय आहे देवेंद्र फडणवीस यांची पोस्ट?

“ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा ( Ratan Tata ) यांच्या निधनाने अवघ्या देशाला मानवतेच्या श्रीमंतीची अनुभूती देणारे एक ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले आहे. त्यांच्या निधनाने मानवतेचा, दातृत्त्वाचा, विश्वासार्हतेचा मानबिंदू हरपला आहे. रतन टाटा जी एक यशस्वी उद्योजक तर होतेच. पण, त्यापलिकडे ते देशाला ठावूक होते. कायम समाजाचा विचार, माणुसकी आणि विनम्रतेचे ते मूर्तिमंत होते. शिक्षण, ग्रामोन्नती आणि कुपोषण-आरोग्याच्या क्षेत्रात त्यांनी केलेले काम अतिशय उल्लेखनीय असेच आहे. देशाच्या आर्थिक विकासासोबतच मानवतेच्या विकासात त्यांनी लावलेला हातभार अत्यंत मोठा आहे. समाजातून कमावलेले समाजालाच परत केले पाहिजे, या श्रद्धेनेच ते कायम जगले.” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- Ratan Tata Death : भारतीय उद्योग जगताचे पितामह रतन टाटा काळाच्या पडद्याआड, अनेकांना समृद्ध करणाऱ्या खास माणसाची कारकीर्द कशी होती?

रतन टाटांशी चर्चा करण्याची संधी मला मिळाली

“फार पूर्वी टाटा ट्रस्टने कँसर रुग्णांसाठी सुरु केलेल्या सुविधा असोत, किंवा अलिकडे मुंबईत सुरु केलेले प्राण्यांचे रुग्णालय हे त्यांच्यातील करुणेचा परिचय देते. रतन टाटा ( Ratan Tata ) यांच्यासोबत अनेकदा भेटीची, चर्चेची संधी मला प्राप्त झाली. मुख्यमंत्री असताना राज्यात ‘व्हीलेज सोशल ट्रान्सफॉर्मेशन फाऊंडेशन’ची निर्मिती आम्ही केली, त्यावेळी बहुतेक बैठकांना ते येत असत. सक्रिय राहून त्यांनी राज्य सरकारसोबत काम केले होते. त्याच काळात राज्यातील गुंतवणूक वाढीसाठी ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’चे आयोजन केले, तेव्हाही ते सातत्याने सोबत होते. नागपुरात आम्ही ‘नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युट’ची स्थापना केली, तेव्हा सातत्याने त्यांचे मार्गदर्शन आणि सक्रिय पाठिंबा प्राप्त झाला. त्यांचे जाणे, ही महाराष्ट्राची, देशाची मोठी हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ॐ शांती” असंही फडणवीस यांनी त्यांच्या पोस्टमध्ये स्पष्ट केलं.