Industrialist Ratan Tata Died at 86 उद्योगपती व टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचं वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक होती. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपाचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. यानंतर एकापाठोपाठ एक प्रतिक्रिया येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. तसंच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही एक पोस्ट लिहून दुःख व्यक्त केलं आहे.
काय आहे नितीन गडकरींची पोस्ट?
“देशाने एक गौरवशाली पुत्र गमावला आहे. रतन टाटा यांच्या निधनाचं वृत्त ऐकून मी स्तब्ध झालो आहे. रतन टाटा आणि मी आमचे तीस वर्षांपासूनचे खूप उत्तम संबंध होते. रतन टाटा यांच्या कौटुंबिक आयुष्यातही मी होतो, त्यांचा आणि माझा अनेक वर्षांचा स्नेह होता. मी त्यांची विनम्रता, त्यांचा साधेपणा सगळंच पाहिलं आहे. त्यांच्या आयुष्यात प्रामाणिकपणा आणि करुणा ही मूल्यं त्यांनी कायमच जपली. रतन टाटा हे अनेकांसाठी प्रेरणास्रोत होते. भारतातील अग्रगण्य उद्योजकांमध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि रोजगार निर्मितीत त्यांनी मोलाचं योगदान दिलं. “
देशाने एक दूरदर्शी आणि दयाळू मार्गदर्शक गमावला
“आपल्या कारकिर्दीत रतन टाटा यांनी अगणित लोकांचं आयुष्य बदललं. आपल्या व्यावसायिक कौशल्यातून त्यांनी एक देशासाठी समर्पित माणूस काय असतो हे दाखवून दिलं. मी त्यांच्याकडून खूप काही शिकलो आहे. माझ्या आयुष्यात ते कायमच स्मरणात राहिल. रतन टाटा यांचं निधन हे देशासाठी क्लेशदायक आणि दुःखदायक आहे. आपण एका दूरदर्शी आणि दयाळू मार्गदर्शकाला आज मुकलो आहोत. ओम शांती! अशी पोस्ट नितीन गडकरींनी लिहिली आहे.
हे पण वाचा- “रतन टाटा विलक्षण माणूस होते”, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला शोक
रतन टाटा १० वर्षांचे असताना त्यांचे आई-वडिल वेगळे झाले. त्यानंतर त्यांना त्यांची आजी नवाझबाई टाटा यांनी जीन पेटिट पारसी अनाथाश्रमातून औपचारिकपणे दत्तक घेतले. रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्यासोबत संगोपन झाले. रतन टाटा यांनी सुरुवातीचे शिक्षण मुंबईतील कॅम्पियन स्कूलमधून घेतले. जिथे त्यांनी आठवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर तो कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमध्ये गेला. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी 1962 मध्ये कॉर्नेल विद्यापीठातून स्ट्रक्चरल अभियांत्रिकीसह आर्किटेक्चरमध्ये बीएस पूर्ण केले. हे शिक्षण पूर्ण करून त्यांनी हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये प्रवेश घेतला. जिथे रतन टाटा यांनी १९७५ मध्ये प्रगत व्यवस्थापन अभ्यासक्रम पूर्ण केला. रतन टाटा यांनी कॅम्पियन स्कूल, मुंबई, कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल, बिशप कॉटन स्कूल, शिमला आणि न्यूयॉर्क शहरातील रिव्हरडेल कंट्री स्कूलमध्ये शिक्षण घेतले. ते कॉर्नेल विद्यापीठ आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलचे माजी विद्यार्थी होते.