Ratan Tata Famous Quotes: भारतीय उद्योग विश्वामध्ये गेल्या सहा दशकांहून अधिक काळ अधिराज्य गाजवणाऱ्या टाटा उद्योग समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांचं निधन झालं. त्यांच्या निधनामुळे उद्योगविश्वावर शोककळा पसरली आहे. पण त्यांच्या निधनानंतरही अजरामर झालेली त्यांची काही वाक्यं ही फक्त नव्या पिढीसाठीच नाही, तर त्यांच्या समकालीन आणि पुढे येणाऱ्या कित्येक पिढ्यांनाही प्रेरणा देत राहतील. उद्योगासोबतच रतन टाटांनी जपलेलं सामाजिक भान आणि त्यातून समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी केलेले अखंड प्रयत्न यातूनच त्यांच्यातलं पराकोटीचं सामाजिक भान त्यांच्या या अजरामर झालेल्या काही वाक्यांमध्ये उतरलं आहे!
टाटा साम्राज्याचा एवढा मोठा डोलारा सांभाळून, मोठा करून आणि जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवूनही रतन टाटांमधला साधेपणा प्रचंड अचंबित करणारा आणि समोरच्याला त्यांच्यासमोर आपोआपच आदराने नतमस्तक करायला लावणारा होता. यशाच्या शिखरावर असतानाही पायथ्याच्या जमिनीशी नातं कधीही न विसरणारा हा अवलिया त्याच्या जीवन जगण्याच्या पद्धतीतूनच जगाला एक अमूल्य असा ठेवा देऊन गेला. त्यांच्या याच जीवनपद्धतीतून अवतरलेली ही त्यांची काही मूल्यच म्हणता येतील!
रतन टाटांची जीवनमूल्य…त्यांची १० अजरामर विधानं!
१. लोखंडाला त्याचा स्वत:चा गंज वगळता दुसरं कुणीही उद्ध्वस्त करू शकत नाही. त्याचप्रमाणे कुणाही व्यक्तीला त्याची स्वत:ची मानसिकताच उद्ध्वस्त करू शकते, इतर कुणीही नाही!
२. लोकांनी तुमच्या दिशेनं भिरकावलेले दगड घ्या आणि त्यातून भव्य स्मारकांची निर्मिती करा!
३. आपल्याला जिवंत ठेवण्यासाठी आपल्या आयुष्यातले चढ-उतार फार महत्त्वाचे असतात. कारण सरळ रेषा, मग ती ईसीजीमधली का असेना, तुम्ही जिवंत नसल्याचं दर्शवते!
४. जर तुम्हाला वेगाने चालायचं असेल, तर एकटे चाला. पण जर तुम्हाला दूरपर्यंत जायचं असेल, तर सोबत चाला!
५. नेतृत्व म्हणजे इतरांवर अधिकार गाजवणं नव्हे, नेतृत्व म्हणजे तुमच्या अधिकारात असणाऱ्यांची काळजी घेणं!
६. सहानुभूती आणि दयाळूपणा ही एखाद्या नेतृत्वाची सर्वोच्च ताकद असते!
७. यश हे तुम्ही कोणत्या पदावर आहात यावरून ठरत नसतं, तर इतरांवर तुमच्या असणाऱ्या प्रभावावरून ठरत असतं!
८. माझा गोष्टी नशीबावर सोडून देण्यावर विश्वास नाही. माझा कठोर मेहनत आणि तयारीवर विश्वास आहे!
९. माझा योग्य निर्णय घेण्यावर विश्वास नाही. मी आधी निर्णय घेतो आणि मग ते योग्य ठरण्यासाठी प्रयत्न करतो!
१०. ज्या दिवशी मी स्वत:हून काही करू शकणार नाही, त्या दिवशी मी माझं सामान आवरेन आणि निघून जाईन!
रतन टाटा यांच्या या गाजलेल्या विधानांचा अंदाज घेतल्यास त्यांचं आयुष्यच त्यातून प्रतिबिंबित होत असल्याचं दिसून येतं. ते स्वत: देखील याच तत्त्वांवर आयुष्य जगले आणि त्यांनी इतरांनाही हीच तत्व अंगीकारण्याचा सल्ला दिला!