मागील काही काळापासून करोनाने जगातील सर्वच लोकांचं वेळापत्रक बदललं आहे. अनेक प्लॅन विस्कटले आहेत आणि नव्याने गोष्टींचं नियोजन करावं लागलं. मात्र, त्यातही करोनाच्या नव्या विषाणूंमुळे त्यातही बदल करण्याची वेळ येते. नवे निर्बंध लागतात आणि त्यामुळे नव्याने ठरवलेले प्लॅन देखील पुन्हा बदलण्याची गरज पडते. त्यामुळेच प्रत्येकासाठी हा करोना काळ खडतर गेलाय. यावरच प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांनी एक पोस्ट केली आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर केलेल्या या पोस्टमध्ये सर्वांना सणाच्या आणि आगामी काळाच्या शुभेच्छा देतानाच या परिस्थितीवर आपली भावना व्यक्त केली.
रतन टाटा यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं, “मागील आणखी एक वर्ष आपल्यापैकी बहुतेक जणांना कठीण गेलं. पण मला मात्र हा वेळ सणांच्या शुभेच्छा देण्यासाठी घ्यायचा आहे. मला आशा आहे की पुढे येणारा काळ जवळच्या प्रिय व्यक्तींसाठी चांगलं आरोग्य आणि खूप सारा आनंद घेऊन येईल.”
हेही वाचा : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नवी नियमावली लागू; वाचा काय असतील निर्बंध!
दरम्यान, जगभरात ओमायक्रॉन विषाणूने आरोग्य विभागाची काळजी वाढवली आहे. करोनाचा हा नवा विषाणू झपाट्याने जगात पसरत आहे. त्याचा संसर्गाचा वेग पाहता अनेक देशांनी पुन्हा एकदा निर्बंध लादण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे सणांच्या उत्सवावरही मर्यादा आल्या आहेत.
महाराष्ट्रातील नवे निर्बंध खालीलप्रमाणे,
- संपूर्ण राज्यभर सर्व सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत बंदी असेल.
- लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.
- इतर सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्यक्रमांसाठी देखील उपस्थितांची संख्या १०० च्या वर नसेल आणि खुल्या जागेत ही संख्या २५० च्या वर नसेल किंवा या जागेच्या क्षमतेच्या २५ टक्के यापैकी जे कमी असेल ते.
- उपरोक्त दोन्ही कार्यक्रमांव्यतिरिक्तच्या कार्यक्रमांसाठी बंदिस्त जागेत जिथे आसनक्षमता निश्चित आहे अशाठिकाणी क्षमतेच्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसेल तसेच जिथे आसनक्षमता निश्चित नाही अशा ठिकाणी २५ टक्के उपस्थिती असेल. अशा प्रकारच्या सर्व कार्यक्रमांमध्ये ते जर खुल्या जागेत होत असतील तर आसनक्षमतेच्या २५ टक्के पेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
- क्रीडा स्पर्धा, खेळाचे समारंभ यासाठी कार्यक्रम स्थळाच्या आसन क्षमतेच्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसेल.
- वरीलपैकी कोणत्याही प्रकारात न मोडणाऱ्या समारंभ किंवा एकत्र येण्याच्या कार्यक्रमात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण उपस्थितांची संख्या किती असावी हे निश्चित करेल. असे करतांना २७ नोव्हेंबर २०२१ चे आपत्ती व्यवस्थापनाच्या आदेशाचे पालन होईल असे बघितले जाईल.
- उपहारगृहे, जीम, स्पा, चित्रपटगृहे, नाट्यगृहे या ठिकाणी क्षमतेच्या ५० टक्के उपस्थिती राहील. या सर्वांना त्यांची संपूर्ण क्षमता तसेच ५० टक्के क्षमतेची संख्या जाहीर करावी लागेल.
- याशिवाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास आवश्यक वाटेल तिथे निर्बंध लावता येतील आणि ते करण्यापूर्वी त्यानी जनतेस त्याची कल्पना देणे आवश्यक राहील.
- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन जिथे आवश्यक वाटेल तिथे अधिक कठोर निर्बंध लावता येतील. अशा परिस्थितीत देखील जनतेला निर्बंधाची योग्य ती माहिती देणे आवश्यक राहील.