Ratan Tata Passed Away in Mumbai: भारतीय उद्योग विश्वाचे अध्वर्यू रतन टाटा यांचं बुधवारी रात्री मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झालं आणि उद्योग विश्वावर शोककळा पसरली. उद्योग क्षेत्रात कमालीच्या स्पर्धात्मक वातावरणात माणुसकी, आपुलकी, जिव्हाळ्याची असंख्य नाती निर्माण करणारा हा अवलिया काळाच्या पडद्याआड गेला. उद्योग क्षेत्रातील त्यांच्या अभूतपूर्व यशापेक्षाही त्यांच्यातल्या माणुसकीवर सगळ्यांनी भरभरून प्रेम केलं. पण टाटांचा फक्त माणसांवरच नाही, तर मुक्या प्राण्यावरही प्रचंड जीव होता. याची साक्ष पटवून देणारा एक प्रसंग सहा वर्षांपूर्वी घडला आणि प्रत्यक्ष ब्रिटिश राजघराणंही टाटांच्या या स्वभावामुळे प्रभावित झालं!
रतन टाटांचं कुत्र्यांवर प्रचंड प्रेम होतं. आणि त्यांच्या याच प्रेमाचा अनुभव थेट ब्रिटिश राजघराण्यालाही आला. हा प्रसंग सहा वर्षांपूर्वीचा म्हणजेच २०१८ सालातला आहे. रतन टाटा यांनी उद्योगक्षेत्राप्रमाणेच सामाजिक आयुष्यातही परोपकारी व निस्वार्थी भावनेनं प्रचंड मोठं काम केलं. त्यांच्या वेगवेगळ्या कंपन्या व स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गरीबांना मदत करण्याचे अनेक उपक्रम राबवले. भारतीय समाजात सकारात्मक बदल घडवण्याचं त्यांचं स्वप्न होतं. त्यासाठीच त्यांनी आयुष्याच्या उत्तरार्धात स्वत:ला झोकून दिलं होतं. आणि त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन त्याचा सन्मान करण्याचं ब्रिटिश राजघराण्यानं ठरवलं होतं!
बकिंगहम पॅलेसमध्ये होता पुरस्कार सोहळा!
६ फेब्रुवारी २०१८ रोजी ब्रिटनच्या बकिंगहम पॅलेसमध्ये हा सोहळा ठरला होता. ब्रिटिश राजघराण्यानं रतन टाटांचा सन्मान करण्यासाठी जंगी सोहळ्याचं आयोजन केलं होतं. प्रत्यक्ष राजघराण्याकडूनच पुरस्कार प्रदान केला जाणार होता, त्यामुळे कार्यक्रमाचं आयोजन, निमंत्रितांची सोय आणि इतर सर्व बाबी तशाच जंगी होत्या. सारंकाही ठरलं होतं. रतन टाटांना थेट प्रिन्स चार्ल्स तृतीय यांच्याहस्ते त्यांच्या समाजकार्यासाठी जीवनगौरव पुरस्कार देण्यात येणार होता. राजघराण्याकडून हा पुरस्कार मिळणं हा एक मोठा सन्मान होता हे वेगळं सांगायची गरजच नाही! पण रतन टाटांनी या पुरस्कार सोहळ्याला येण्यास चक्क नकार दिला! उद्योजक सोहेल सेठ हे स्वत: या कार्यक्रमासाठी जाणार होते. त्यामुळे त्यांनी यासंदर्भातला प्रसंग एका इन्स्टा पोस्टमध्ये सांगितला आहे!
आधी रतन टाटांनी सोहळ्यासाठी येण्याची तयारी दर्शवली होती. ठरल्यानुसार सगळं नियोजन झालं. त्यानुसार बकिंगहम पॅलेसमध्ये तयारीही सुरू झाली. पण सोहळ्याच्या अगदी दोन ते तीन दिवस आधीच रतन टाटांनी आपण येऊ शकत नसल्याचं कळवलं! सुहेल सेठ या इन्स्टाग्राम व्हिडीओमध्ये सांगतात, “मी लंडन एअरपोर्टवर उतरेपर्यंत माझ्या मोबाईलवर रतन टाटांचे ११ मिस्ड कॉल होते. मी त्यांना जेव्हा कॉल केला, तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला. त्यांचे दोन कुत्रे टँगो आणि टिटो यांच्यापैकी एक प्रचंड आजारी पडला होता. त्यामुळे आपण पुरस्कार सोहळ्याला येऊ शकत नाही, असं त्यांनी कळवलं होतं”!
ब्रिटिश राजघराण्याच्या पुरस्कारापेक्षाही टाटांसाठी त्यांचे कुत्रे प्रिय होते. त्यामुळेच सोहेल सेठ यांनी एवढ्या मोठ्या पुरस्कार सोहळ्याला नकार देऊ नका, असा टाटांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला. पण रतन टाटांचा निर्णय झाला होता. त्यांना त्यांच्या आवडत्या टँगो आणि टिटोसोबत थांबायचं होतं. नव्हे, तेव्हा तेच त्यांच्यासाठी सर्वात प्राधान्याचं होतं!
जेव्हा प्रिन्स चार्ल्सला याबाबत कळलं…
दरम्यान, सुहेल सेठ यांनी प्रिन्स चार्ल्स यांना जेव्हा याबाबत कळलं तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया होती हेही सांगितलं. या व्हिडीओत सुहेल सेठ म्हणतात, “जेव्हा प्रिन्स चार्ल्स यांना रतन टाटा येत नाहीत याबाबत समजलं आणि जेव्हा त्यामागचं कारण कळलं, तेव्हा त्यांना याचं मोठं कौतुक वाटलं. ते म्हणाले, हा खरा माणूस आहे. रतन टाटा असेच आहेत. त्यामुळेच टाटा घराणं इतक्या उंचीवर आहे. त्यामुळेच टाटांची प्रगती इतक्या शाश्वत पद्धतीने होत आहे”, असं सेठ यांनी सांगितलं.
रतन टाटांचं प्राणीप्रेम!
मुक्या प्राण्यांवर रतन टाटांचं फार प्रेम होतं. त्यातही कुत्र्यांवर त्यांचा विशेष जीव होता. गेल्या काही वर्षांत त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सातत्याने कुत्र्यांसाठी लोकांना आवाहन करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या होत्या. याच वर्षाच्या सुरुवातीला रतन टाटांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईत टाटा ट्रस्टचं ‘स्मॉल अॅनिमल हॉस्पिटल’ देखील सुरू झालं होतं.