Narayan Murthy Express over Ratan Tata Death : टाटा या नाममुद्रेच्या माध्यमातून भारतीय उद्योग जगताला आधुनिक युगात नेण्यासाठी झटणारे आणि या क्षेत्राचा ठसा आंतरराष्ट्रीय प्रतलावर उमटवणारे द्रष्टे उद्योगपती, दानवीर, टाटा उद्योसमुहाचे माजी अध्यक्ष रतन नवल टाटा यांचं बुधवारी रात्री मुंबईतील रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झालं. रतन टाटा गेले काही दिवस आजारी होते. आपल्या प्रकृतीस धोका नसल्याचं त्यांनी सोमवारीच समाज माध्यमांवर जाहीर केले होते. परंतु, बुधवारी त्यांची प्रकृती खालावली आणि रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. सायंकाळी वरळीतील स्मशानभूमीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, इन्फोसिसचे अध्यक्ष नारायण मूर्ती यांनी त्यांच्याबरोबरची एक आठवण शेअर केली आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

इंडिया टुडेशी साधलेल्या संवादात नारायण मूर्ती म्हणाले, “मी एकदा त्यांना अक्षय पत्र किचनच्या उद्घाटनासाठी आमंत्रित केले होते. यासाठी माझ्या पत्नीने निधी दिला होता. ते कर्नाटकातील हुबळी येथे आले. दोन-अडीच दिवस ते तिथे राहिले. त्यांनी प्रत्येक कार्यक्रमात सहभाग घेतला होता.”

हेही वाचा >> Ratan Tata Death : अखेरचा सलाम! उदार अंत:करणाच्या उद्योजकाला निरोप देताना महाराष्ट्रासह देशही हळहळला

“तरुण, वडिलधारी, श्रीमंत, कमी श्रीमंत, नोकरशाह, मंत्री या सर्वांबरोबर त्यांनी संवाद साधला. म्हणून तो माझ्यासाठी नम्रतेचा धडा होता. दयाळू भांडवलशाहीचा धडा होता. आपण आपल्या हृदयाचा एक भाग भाग्यवान लोकांसाठी कसा राखून ठेवू शकतो, याचा धडा होता”, असंही ते पुढे म्हणाले.

दिल्लीत रतन टाटांनी डिनर कार्यक्रम केला होता आयोजित

अशाच आणखी एका घटनेची आठवण करून देताना मूर्ती म्हणाले की, “आशिया बिझनेस काऊन्सिलचे अध्यक्ष असताना १२ – १३ वर्षांपूर्वी रतन टाटा यांना दिल्लीत बोलावले होते. या कार्यक्रमात आशिया, यूएस आणि युरोपमधील काही मोठ्या कंपन्यांचे सीईओ एकत्र आले, जिथे मूर्ती यांनी पंतप्रधानांसोबत बैठकीची व्यवस्था केली होती. टाटा यांनी डिनरचे आयोजन करावे आणि भाषण करावे अशी त्यांची इच्छा होती.

“ते मुंबईवरून आले होते. जवळपास ४५ मिनिटे ते थांबले आणि एका उत्कृष्ट डिनरचे आयोजन केले. ते बोलण्यात अगदी संयम बाळगून होते. ते म्हणाले, ”’मूर्ती, कृपया मला बोलण्यास भाग पाडू नका’. ते अगदी विनम्र होते आणि सर्व पाहुण्यांची खूप आपुलकीने, कौतुकाने आणि आदराने काळजी घेत होते”, असंही नारायण मूर्ती म्हणाले.