Ratan Tata Property : प्रसिद्ध उद्योजक रतन टाटा यांचं निधन मागील वर्षी झालं. आता त्यांच्या मृत्यूपत्रानुसार त्यांची संपत्ती कुणाला देण्यात आली ? हे समोर आलं आहे. त्यांची संपत्ती साधारण ३९०० कोटी रुपये आहे. ज्यामध्ये टाटा सन्सचे शेअर्स आणि इतर मालमत्ता आहेत. मृत्यूपत्रातील माहितीनुसार संपत्तीचा मोठा हिस्सा दान करण्यात आला आहे. तसंच रतन टाटा एन्डॉवमेंट आणि रतन टाटा एन्डॉमेंट ट्रस्ट यांना देणगी देण्यात आली आहे. ही रक्कम समाजसेवेसाठी वापरण्यात येणार आहे.
रतन टाटांच्या बहिणींना मिळणार संपत्तीत वाटा
रतन टाका यांच्या मालमत्तेपैकी एक तृतीयांश संपत्ती म्हणजे सुमारे ८०० त ८५० कोटी ज्यामध्ये बँक एफ.डी. आर्थिक साधनं, घड्याळ आणि पेटिंग यांचा समावेश आहे ती मालमत्ता रतन टाटांच्या सावत्र बहिणी शिरीन जेजीभॉय आणि दिना जेजीभॉय यांच्या नावे करण्यात आली आहे. एक तृतीयांश हिस्सा मोहीनी एम. दत्ता या टाटा समूहाच्या माजी कर्मचारी महिलेला दिला जाणार आहे.
रतन टाटांच्या भावाला काय मिळालं?
रतन टाटांचे भाऊ जिमी नवल टाटा यांना जुहू येथील बंगल्याचा वाटा मिळणार आहे. तर रतन टाटांचा जवळचा मित्र मेहली मिस्त्री यांना अलिबागची मालमत्ता आणि तीन बंदुका ज्यामध्ये २५ बोअरच्या पिस्तुलाचाही सामवेश आहे, ते सगळं मित्राला देण्यात आलं आहे.
पाळीव प्राण्यांसाठीही मृत्यूपत्रात तरतूद
रतन टाटा यांनी त्यांच्या पाळीव प्राण्यांसाठी १२ लाख रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे, ज्यातून प्रत्येक प्राण्याला दर तीन महिन्यांनी ३० हजार रुपये मिळतील. त्यांचे सहाय्यक शंतनू नायकुडू यांचे विद्यार्थी कर्ज आणि शेजारी जेक मलाईते यांचे व्याजमुक्त शैक्षणिक कर्ज माफ करण्यात आले आहे.
रतन टाटांच्या विदेशातील संपत्तीचं काय?
रतन टाटा यांच्या विदेशी संपत्तीमध्ये (सुमारे ४० कोटी रुपये) सेशेल्समधील जमीन, वेल्स फार्गो आणि मॉर्गन स्टॅनली येथील बँक खाती आणि कंपन्यांमधील शेअर्स यांचा समावेश आहे. त्यांची ६५ मौल्यवान घड्याळे (Bvlgari, Patek Philippe, Tissot इ.) देखील इस्टेटमध्ये समाविष्ट आहेत. त्यांच्या मृत्यूपत्रानुसार सेशेल्समधील जमीन ‘आरएनटी असोसिएट्स सिंगापूर’कडे जाईल. जिमी टाटा यांना चांदीची भांडी आणि काही दागिने मिळतील, तर सायमन टाटा आणि नोएल टाटा यांना उर्वरित जुहू मालमत्ता मिळेल. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.
मेहली मिस्त्री यांना अलिबाग बंगला भेट देताना रतन टाटा यांनी लिहिले की, ही मालमत्ता बांधण्यात मिस्त्री यांचे मोठे योगदान आहे आणि आशा आहे की, हे ठिकाण त्यांना एकत्र घालवलेल्या आनंदाच्या क्षणांची आठवण करून देईल. न्यायालयात मृत्यूपत्राची पुष्टी झाल्यानंतरच मालमत्तेची विभागणी केली जाईल, ज्यासाठी 6 महिने लागू शकतात.