उत्तर प्रदेशातील मथुरा पोलिसांनी एक अजब दावा केला आहे. शेरगड आणि हायवे पोलीस ठाण्यातील गोदामांमध्ये साठवलेला ५८१ किलो मारिजुआना ड्रग्जचा साठा उंदरांनी फस्त केल्याचा दावा मथुरा पोलिसांनी विशेष नार्कोटिक्स ड्रग्ज न्यायालयात केला आहे. एनडीपीसी कायद्याअंतर्गत यावर्षी जप्त केलेल्या मारिजुआना या ड्रग्जबाबत माहिती देण्यास न्यायालयाने सांगितल्यानंतर पोलिसांनी हा अहवाल सुपुर्द केला आहे. या ड्रग्जची किंमत तब्बल ६० लाख रुपये होती.
पोलिसांच्या या दाव्यानंतर अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनी मथुराचे एसएसपी अभिषेक यादव यांना पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. उंदरांच्या धोक्याबाबत उपाययोजना करण्याच्या सूचनाही न्यायालयाने दिल्या आहेत. पोलिसांच्या गोदामांमध्ये साठवण्यात आलेल्या ड्रग्जचा लिलाव अथवा विल्हेवाटीसंदर्भात न्यायालयाने पाच कलमी निर्देशही जारी केले आहेत. या प्रकरणात पुढील सुनावणी २६ नोव्हेंबरला होणार आहे. न्यायालयाच्या आदेशांचे कालबद्ध पद्धतीने पालन केले जाईल, असे अभिषेक यादव यांनी सांगितले आहे.
दरम्यान, पार पडलेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने हायवे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका प्रकरणाचा उल्लेख केला. १९५ किलो ड्रग्ज उंदराने खालल्याची माहिती सरकारी वकिलाने न्यायालयात दिली होती, असे न्यायाधीशांनी या सुनावणीदरम्यान सांगितले. या प्रकरणात सीओ रिफायनरीने केलेल्या तपासादरम्यान ड्रग्ज आढळून आले नाही, अशी माहिती एसएसपींनी न्यायालयात दिली आहे. “आकाराने लहान असल्याने उंदरांना पोलिसांची भीती नसते. एसएचओ सर्व समस्यांचे निराकरण करण्यात तज्ज्ञ असू शकत नाही”, असं स्पष्टीकरणही मथुरा पोलिसांकडून न्यायालयात देण्यात आलं.
मे २०२० मध्ये ड्रग्जची तस्करी करणाऱ्या तिघांना मथुरा पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडून ३८६ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं. या आरोपींवर एनडीपीसी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली होती. या प्रकरणातील ड्रग्जबाबत न्यायालयाने विचारणा केली असता हे ड्रग्ज उंदरांनी खालल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले होते.