उंदरांची समस्या ही जवळपास सर्वच ठिकाणी असल्याचं जाणवतं. काही ठिकाणी ती कायमस्वरूपी असते, काही ठिकाणी कधीतरी दिसते तर काही ठिकाणी नियमित काळजी घेतल्यामुळे थोपवून धरलेली असते. पण भारताच्या पूर्वेकडचं एक महत्त्वाचं शहर, बंदर आणि पश्चिम बंगालची राजधानी असणारं कोलकाता सध्या यातल्या पहिल्या प्रकारात आलंय. शहरात उंदरांची समस्या इतकी वाढलीये की त्यापुढे फक्त नागरिकच नव्हे, तर खुद्द प्रशासनानंही हात टेकले आहेत. काय करावं, हेच सुचत नसल्यामुळे उंदरांचा हा हैदोस फक्त उघड्या डोळ्यांनी बघत राहण्याची नामुष्की प्रशासनावर आली आहे!
काय घडतंय कोलकात्यामध्ये?
कोलकात्यामध्ये उंदरांनी हैदोस घातला आहे. कोलकात्याच्या गल्लीबोळांपासून ते थेट विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयापर्यंत सर्वत्र उंदरांनी धुमाकूळ घातला असून त्यावर सध्या कोलकात्यामध्ये प्रशासकीय यंत्रणा खलबतं करत आहे. उंदरांना आवर कसा घालावा? या चिंतेत सध्या कोलकाता महानगरपालिका प्रशासन आहे. राज्यातील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाकडेच कोलकाता महापालिकेचा कारभार आहे. पालिकेतील नगरसेवक व महापौरदेखील उंदरांच्या समस्येवर अद्याप प्रशासनाला तोडगा सापडला नसल्याचं सांगत असताना नागरिक मात्र भीतीच्या छायेखाली जगत आहेत. विशेषत: दक्षिण कोलकात्यातील ढकुरीय व भवानीपोरे भागातील उड्डाणपुलाजवळील जनता!
या दोन भागात उंदरांनी मोठ्या प्रमाणावर नुकसान केलं आहे. इंडियन एक्स्प्रेसनं यासंदर्भा सविस्तर वृत्त दिलं आहे. सीलदाह पुलाजवळ राहणाऱ्या स्थानिक नागरिक सोनिया मंडोल सांगतात, “एखादा केक खावा, तसे हे उंदीर हा पूल खात आहेत. दररोज आम्हाला पुलाचा काही भाग पडल्याचं दिसतं”! पालिकेकडून सातत्याने उंदरांना आवर घालण्यासाठी औषध फवारणी, पेस्ट कंट्रोल, त्यांची बिळं बुजवणं असे उपाय केले जात आहेत. पण पालिका कर्मचाऱ्यांनी बुजवलेली बिळं काही दिवसांत पुन्हा पडलेली असतात!
“विधानसभेतील एकमेव तटस्थ घटक!”
उंदरांनी पश्चिम बंगालच्या विधानसभेलाही सोडलेलं नाही. खुद्द विधानसभा अध्यक्षच म्हणतात की मी स्वत: विधानभवनात उंदीर पाहिलेत. “उंदरांना मारण्यासाठी आम्ही विष वापरत नाही आहोत. कारण त्यानंतर येणारा वास सहन करण्यापलीकडचा असेल”, असं विधानसभा अध्यक्ष बिमन म्हणाले. विधानसभेतील एक प्रशासकीय अधिकारी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हणाले, “मी तर असं म्हणेन, की विधानसभेत उंदीर हा एकमेव तटस्थ घटक आहे. सत्ताधारी व विरोधी अशा दोन्हीकडच्या सदस्यांना उंदरांनी हैराण केलंय. विरोधी पक्षनेत्यांचं जेवण उंदरांनी फस्त केलं तर तिकडे अध्यक्षांच्या खोलीतल्या कागदपत्रांचं नुकसान केलं!”
‘हा तर मुस्लीम मुलींचा अवमान’, राहुल गांधी यांच्या कुत्र्याच्या नावावरून एमआयएमची टीका
खुद्द कोलकाता महापालिकेच्या सर्व्हर रूममध्ये उंदरांनी सर्वाधिक हैदोस घातला आहे. वायर, महत्त्वाची यंत्रसामग्री, मोठमोठ्या केबल्सवर उंदरांनी अगदी यथेच्छ ताव मारला आहे.
उपाय काय?
अनेक तज्ज्ञांच्या मते एवढ्या मोठ्या प्रमाणावर फैलावलेल्या उंदरांसाठी शहरात रस्त्याच्या कडेला अन्नपदार्थांची होणारी विक्री कारणीभूत आहे. त्यांच्याकडून उरलेले अन्नपदार्थ रस्त्याच्या कडेलाच टाकले जातात. तिथूनच उंदरांचा फैलाव होतो. जर उंदरांना आवर घालायचा असेल, तर जंगली मांजर, घुबड अशा प्राण्यांना उंदरांचा फैलाव असणाऱ्या भागात सोडायला हवं. तिकडे पालिका प्रशासन व खुद्द पश्चिम बंगाल सरकारही या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करत आहे!