Ravindra Sing Negi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पटपडगंजचे उमेदवार रविंद्र सिंह नेगी यांना तीनवेळा वाकून नमस्कार केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कृतीची चांगलीच चर्चा सुरु आहे. ते आता निकालांमध्ये आघाडीवर आहेत की पिछाडीवर? हे आपण जाणून घेणार आहोत.

रवींद्र सिंह नेगी आघाडीवर

पटपडगंज या मतदारसंघातून रवींद्र सिंह नेगी आघाडीवर असून त्याच मतदारसंघातून यूपीएससी क्लासेससाठी प्रसिद्ध शिक्षक आपचे अवध ओझा पिछाडीवर आहेत. या दोघांमध्ये सुरुवातीला तगडी टक्कर पाहण्यास मिळाली. मात्र अवध ओझांना रवींद्र सिंह नेगी यांनी सध्या तरी मागे टाकलं आहे.

काय घडलं होतं प्रचारा दरम्यान ?

पटपडगंज विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार रवींद्र सिंह नेगी (वय ४५) यांना वाकून नमस्कार केल्यामुळे त्यांच्याबद्दल जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता लागली होती. नेगी यांच्यानंतर विश्वास नगरचे उमेदवार ओम प्रकाश शर्मा यांनीही मोदी यांच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला होता, मात्र त्यांना मध्येच अडविण्यात आले. याआधीही जाहीर कार्यक्रमात मोदींनी त्यांच्या पाया पडणाऱ्या लोकांना थांबवले होते. पंतप्रधान मोदी कुणालाही त्यांच्या पाया पडू देत नाहीत, अशी कृती करणाऱ्यांना त्यांनी अनेकदा अडवलं आहे. दरम्यान रवींद्र सिंह नेगी हे आघाडीवर आहेत आता निकाल त्यांच्या बाजूने लागणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

कोण आहेत रवींद्र सिंह नेगी?

रवींद्र सिंह नेगी हे सध्या विनोद नगरमधून नगरसेवक आहेत. हा विभाग पटपडगंज विधानसभा मतदारसंघात मोडतो. रवींद्र सिंह नेगी गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या वादग्रस्त कृतीमुळे चर्चेत आहेत. त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर त्यांनी काही व्हिडीओ शेअर केले होते, ज्यामुळे वाद उद्भवला. पश्चिम विनोद नगर येथे असलेल्या एका डेअरीच्या समोर उभे राहून नेगी यांनी डेअरी चालकाला धमकावले होते. अल्तमश तोमर नामक मालकाच्या डेअरीचे नाव फक्त तोमर ठेवण्यात आले होते. नेगींचे म्हणणे होते की, तुमचे पहिले नाव जे काही असेल, तेही दुकानावर दिसले पाहिजे. फक्त तोमर लिहून चालणार नाही. जर पूर्ण नाव दुकानावर लिहिले नाही तर दुकान बंद करू, अशीही धमकी त्यांनी दिली होती. याशिवाय नेगी यांनी हिंदू फेरीवाल्यांनाही आवाहन करत असताना भगवा झेंडा गाडीवर लावण्यास सांगितले होते. तसेच हिंदू सणांआधी त्यांनी खाटिकाच्या दुकानाला भेट देऊन सणांच्या काळात दुकान बंद ठेवण्यास सांगितले होते.

Story img Loader