केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारने भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या प्रमुखांना आणखी सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक राजीव जैन आणइि रिसर्च अँड अॅनलिसिस विंग म्हणजेच रॉ चे प्रमुख अनिल कुमार धस्माना यांना आणखी सहा महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. यावर्षी ३० डिसेंबरला दोघांचा कार्यकाळ संपणार होता.

इंटेलिन्स ब्युरोवर देशांतर्गत आणि भारताच्या सीमेलगतच्या देशांची माहिती गोळा करण्याची जबाबदारी असते. रॉ परदेशात राहून भारताच्या सुरक्षेला कोणापासून धोका आहे. भारता विरोधात कोण काय कारस्थान रचतय त्याची माहिती गोळा करण्याची जबाबदारी आहे. रॉ चे एजंट परदेशात राहून भारतीय सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाची जबाबदारी पार पाडत असतात. अनेकदा चित्रपटातून आपण रॉ चे थक्क करणारे कारनामे पाहतो. रॉ च्या हेरांना ओळखणे कठिण असते. त्यामुळे या अदृश्य शक्तीविषयी सर्वसामान्यांना प्रचंड आकर्षण आहे.

भारतात राहून अन्य देशांचे एजंट जी माहिती गोळा करतात त्यांना शोधून काढण्याची जबाबदारी इंटेलिजन्स ब्युरोवर असते. राजीव जैन आणि अनिल कुमार धस्माना १ जानेवारी २०१७ पासून इंटेलिजन्स ब्युरो आणि रॉ च्या प्रमुखपदाची जबाबदारी संभाळत आहेत. जवळपास दोन दशकापासून दोघेही गुप्तचरयंत्रणांसाठी काम करत आहेत. जैन झारखंड केडरचे आयपीएस अधिकारी असून १९८९ पासून इंटेलिजन्स ब्युरोमध्ये काम करत आहेत. धस्माना मध्य प्रदेश केडरचे आयपीएस अधिकारी असून ते १९९३ पासून रॉ मध्ये काम करत आहेत.

 

Story img Loader