काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द झाल्यानंतर बदल होताना दिसत आहेत. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित झाल्याचं चित्र आहे. अशात १५ ऑगस्टच्या म्हणजेच देशाच्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर एक अनोखं चित्र काश्मीरमध्ये पाहण्यास मिळालं. हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सहभागी झालेल्या दहशतवाद्याच्या भावाने हातात तिरंगा ध्वज घेऊन तो फडकवला आहे. दहशतवादी जावेद मट्टू याचा भाऊ रईस मट्टूने हातात तिरंगा ध्वज घेतला आणि तो आपल्या घराबाहेर तो फडकवताना दिसतो आहे. रईसचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
जावेद मट्टू हा हिजबुल मुजाहिद्दीन या संघटनेचा दहशतवदी आहे. गेल्या ११ वर्षांपासून तो पाकिस्तानात सक्रिय आहे. जावेद मट्टूला फैसल, साकीब, मुसैब या नावांनीही ओळखलं जातं. सुरक्षा यंत्रणाच्या यादीत तो घाटीतल्या टॉप दहा दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी आहे. याच दहशतवाद्याच्या भावाने हाती तिरंगा ध्वज घेऊन तो आपल्या घराबाहेर फडकवला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. इंडिया टुडेने याविषयीचं वृत्त दिलं आहे.
रईस मट्टूने काय म्हटलं आहे?
“माझा भाऊ जावेद मट्टू याने चुकीचा मार्ग अवलंबला आहे. दहशतवादाचा मार्ग हा विनाशाकडे नेणाराच मार्ग आहे. कुठल्याही तरुणांनी याकडे वळू नये. तसंच कुठल्याही प्रकारच्या चिथावणीला बळी पडू नये.” असं रईस मट्टूने म्हटलं आहे.
रविवारच्या तिरंगा रॅलीलाही उत्तम प्रतिसाद
रविवारी श्रीनगरमध्ये एक भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली. त्यात जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा सहभागी झाले होते. स्वातंत्र्य दिवसाच्या पार्श्वभूमीवर ही रॅली काढण्यात आली. या रॅलीला उत्तम प्रतिसाद मिळाला. स्वातंत्र्य दिवसाच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आला आहे.
श्रीनगरमधील ऐतिहासिक लाल चौकातून रविवारी एक बाइक रॅली काढण्यात आली. यावेळी प्रत्येकाच्या हातात तिरंगा होता. याशिवाय स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षे होत आहेत, अशा परिस्थितीत बाईकस्वारांनी तिरंगा यात्रा काढली होती. त्या तिरंगा यात्रेचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.