रेमंड समूहातील वडिल आणि मुलाचा वाद गेल्या अनेक दिवसांपासून चव्हाट्यावर आला आहे. वडिल विजयपत सिंघानिया यांना ऑटोबायोग्राफी लिहायचीये पण त्यांचा मुलगा आणि रेमंड समूहाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संस्थापक गौतम सिंघानिया यांचा त्याला विरोध आहे. ऑटोबायोग्राफी रोखावी यासाठी आणि त्यात काय प्रकाशीत होतंय याबाबत माहिती मिळावी यासाठी गौतम सिंघानिया यांनी मुंबईतील कोर्टात याचिकाही दाखल केली होती. पण न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. वडिलांच्या पुस्तकामुळे माझ्या प्रतिमेला धक्का पोहोचेल असं गौतम सिंघानियांनी न्यायालयाला सांगितलं होतं. पण न्यायालयाने त्यांची याचिका अखेर फेटाळली आहे.

रेमंड कंपनीला उत्तुंग शिखरावर पोहोचवणाऱ्या विजयपत सिंघानिया यांना त्यांच्याच मुलाने कंपनीतून हटवलंय. त्यांना एका पत्राद्वारे तुम्ही आता रेमंड समूहाच्या संचालक मंडळाचे सदस्य नसल्याचं सांगण्यात आलं आहे. निवृत्त अध्यक्ष पदावरुनही गौतमने त्यांना हटवलंय. संचालक मंडळाच्या बैठकीला बोलावलं जात नाही अशी विजयपत सिंघानिया यांनी वारंवार तक्रार केली होती. त्यानंतर त्यांना निवृत्त अध्यक्ष पदावरुनही हटवण्यात आलं.

वर्ष 2015 मध्ये विजयपत यांनी रेमंड समूहाचे कंट्रोलिंग स्टेक (50 टक्क्यांहून अधिक शेअर) मुलगा गौतमच्या नावावर केले होते. वर्ष 2007 मध्ये झालेल्या करारानुसार विजयपत यांना मुंबईच्या मालाबार हिल परिसरात 36 महलच्या जेके हाउसमध्ये एक अपार्टमेंट मिळणार होतं. याची किंमत बाजारभावापेक्षा बरीच कमी ठेवण्यात आली होती. नंतर कंपनी गौतम सिंघानियांच्या हाती गेली आणि त्यांनी इतकी बहुमुल्य संपत्ती विकण्यास परवानगी नाकारली. यामुळे दोघांमध्ये वाद वाढला. ज्या मुलाला माझा सर्व व्यवसाय दिला त्यानेच मला घरातून बाहेर काढलं असा आरोप नंतर विजयपत यांनी केला. आता आपली संपत्ती परत मिळवण्यासाठी विजयपत सिंघानिया कायदेशीर लढाई देत आहेत.

Story img Loader