ख्रिसमस संपल्यानंतर आता संपूर्ण जगभरात नवीन वर्ष साजरं करण्याची तयारी सुरु आहे. दरम्यान रझा अकादमीने मुस्लीम तरुणांना नववर्ष साजरं न करण्याचं आवाहन केलं आहे. नववर्ष साजरं करणं ‘हराम’ असल्याचं रझा अकादमीच्या अध्यक्षांनी म्हटलं असून तरुणांना नववर्षाच्या पार्टीचं आयोजन किंवा सेलिब्रेशन करु नका असं सांगितलं आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री होणाऱ्या पार्टींमध्ये केल्या जाणार्या ‘अश्लील कृत्यांमुळे’ सैतानालाही लाज वाटू शकते असा दावाही त्यांनी केला.
रझा अकादमीने ट्विटरला एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत रझा अकादमीचे अध्यक्ष सईद नुरी सांगत आहेत की “वर्षाची शेवटची रात्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ३१ डिसेंबरला निर्लज्जपणाची हद्द ओलांडली जाते हे खेदजनक आहे. अशा पार्ट्यांमध्ये सेलिब्रेशनच्या नावाखाली कोणते अशोभनीय कृत्य केलं जात नाही. अशा वाईट कृत्यांमुळे सैतानालाही लाज वाटेल. अशा हराम प्रथा सर्व धर्माचे आणि जातीचे लोक करतात आणि विशेषत: मुस्लिम तरुण अशा हराम क्रियांमध्ये फार रस घेतात”.
सईद नुरी यांनी मुस्लीम पालकांना आपल्या मुलांची निर्लज्ज कृत्यांमधून सुटका करण्याचं आवाहन केलं असून अशा पार्ट्यांमध्ये सहभागी होण्यापासून रोखण्यास सांगितलं आहे.
“आपल्या मुलांना अशा अनैतिक कृत्य आणि निर्लज्जपणात सहभागी होण्यापासून रोखण्यासाठी आपल्याकडे अजूनही वेळ आहे. आपण त्यांना अशा सेलिब्रेनमध्ये जाण्यापासून रोखले पाहिजे”, असं ते म्हणाले आहेत.
दुसऱ्या एका ट्वीटमध्ये रझा अकादमीने मुस्लिमांना नववर्षाच्या नावाखाली अश्लील कार्यक्रमांचं आयोजन करण्यापेक्षा प्रार्थना आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यास सांगितलं आहे.