देशात सध्या मोठ्या प्रमाण डिजिटल बँकिंग पर्याय उपलब्ध आहे. सहज सोप्या पद्धतीने डिजिटल माध्यमांतून देवाणघेवाण केली जाते. डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया प्रयत्नशील आहे. या दरम्यानं डिजिटल व्यवहारासंदर्भात आरबीआयने एक सूचना जारी केली आहे. तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी काही अपडेट केले जाणार आहेत. त्यामुळे २३ मे रोजी काही तासांसाठी नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड्स ट्रान्सफर (NEFT) सेवा बंद असणार आहे. याबाबतची माहिती आरबीआयनं ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
एनईएफटी सेवा अधिक कार्यक्षम करण्यासाठी रात्री १२ ते २३ मे रोजी दुपारी २ वाजेपर्यंत ही सेवा बंद असणार आहे. त्यामुळे या वेळेत पैशांचा व्यवहार करता येणार नाही. जवळपास १४ तास ही सेवा बंद असणार आहे. अपग्रेड दरम्यान बँक खातेधारकांना त्याचे अपडेट मिळतील असंही आरबीआयकडून सांगण्यात आलं आहे. १८ एप्रिल २०२१ रोजीही असंच अपग्रेडशन करण्यात आलं होतं.
NEFT System Upgrade – Downtime from 00.01 Hrs to 14.00 Hrs. on Sunday, May 23, 2021https://t.co/i3ioh6r7AY
— ReserveBankOfIndia (@RBI) May 17, 2021
एनईएफटीच्या माध्यमातून दोन लाखांपर्यंतचा व्यवहार केला जातो. या माध्यमातून एका बँकेतून दुसऱ्या बँके खात्यात थेट पैसे पाठवण्याची सुविधा आहे. यासाठी दोन्ही बँक खातेधारकांकडे इंटरनेट बँकिंग सेवा असणं गरजेचं आहे. डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी ६ जून २०१९ रोजी आरबीआयने एनईएफटी सेवा निशुल्क केली आहे. ही सुविधा यापूर्वी सकाळी ८ ते संध्याकाळी ७ पर्यंत होती. त्यानंतर ही सुविधा २४ तास उपलब्ध करून देण्यात आली.