सामान्यपणे सरकारी किंवा खासगी अशा दोन्ही ठिकाणी महिन्याच्या पहिल्या दहा दिवसांमध्ये पगार जमा होतात. मात्र, कधीकधी पगार जमा होण्याच्या ठरलेल्या तारखेच्या दिवशीच सार्वजनिक सुट्टी, वीकएंड किंवा सणासुदीची सुट्टी येते आणि पगार जमा होणं लांबतं. मात्र, येत्या १ ऑगस्टपासून आठवड्याच्या कोणत्याही दिवशी किंवा सुट्टीच्या दिवशी देखील पगार, पेन्शन, व्याज, डिव्हिडंड आपल्या खात्यात जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात RBI नं यासंदर्भात निर्णय जाहीर केला आहे. यानुसार नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाऊस अर्थात NACH ची सुविधा आठवड्याच्या सातही दिवशी आणि वर्षाच्या पूर्ण ३६५ दिवशी उपलब्ध राहणार आहे. आरबीआयनं परिपत्रक काढून यासंदर्भात माहिती दिली आहे.
कोणत्या प्रकारच्या ट्रान्सफरला होणार फायदा?
आरबीआयने परिपत्रकात म्हटल्यानुसार, सध्याच्या कोविड काळामध्ये सरकारी अनुदान असो किंवा खूप साऱ्या खात्यांमध्ये एकाचवेळी ट्रान्सफर करण्याची रक्कम असो, त्यासाठीच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) साठी NACH लाच सर्वाधिक पसंती मिळते आहे. सध्या या माध्यमातून डिव्हिडंड, व्याज, पगार, पेन्शन, वीजबिलाची रक्कम ऑनलाईन पद्धतीने जमा करणं, गॅस, टेलिफोन, पाण्याची बिलं जमा करणं किंवा कर्जावरील व्याज, म्युच्युअल फंड, विम्याचे हफ्ते भरण्यासाठी देखील या सुविधेचा वापर केला जातो.
१ ऑगस्टपासून मिळणार सुविधा!
सध्या NACH ची सुविधा फक्त बँक सुरू असते त्याच दिवशी दिली जाते. बँकेच्या सुट्टीच्या दिवशी ही सुविधा देखील बंद असते. मात्र, येत्या १ ऑगस्टपासून आठवड्याचे सर्व दिवस ही सुविधा सुरू असेल. RTGS आता आठवड्याच्या सर्व दिवशी उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याच आधारे ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे.
करोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसल्याने RBI ने अर्थव्यवस्थेचा अंदाजित विकासदर घटवला; व्याजदर जैसे थे
“आरबीआयनं घेतलेला हा निर्णय खूपच महत्त्वाचा आहे. यामुळे फक्त लाखो लोकांना पगार, पेन्शन किंवा स्कॉलरशिप, सरकारी अनुदान मिळण्यामध्ये फायदा होणार नसून अनेक मोठमोठ्या कंपन्यांना देखील बल्क पेमेंट करण्यासाठी याचा फायदा होणार आहे”, अशी प्रतिक्रिया पीसी फायनान्शिअलचे सीईओ रघुविर गखार यांनी दिली आहे.