रघुराम राजन यांच्याकडे दुसऱ्यांदा रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदाची सूत्रे सोपविण्यात येणार का, याबद्दल सोमवारी एका कार्यक्रमात विचारण्यात आलेल्या प्रश्नाला केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी बगल दिली. मात्र, रिझर्व्ह बँक आणि वित्त मंत्रालयातील संबंध परिपक्व असल्याचे सांगत जेटली यांनी सर्वकाही आलबेल असल्याचा दावा केला. मोदी सरकारच्या कार्यकाळात विशेषत: आर्थिक विकास आणि व्याजदराच्या मुद्द्यावरून राजन आणि जेटली यांच्यात अनेकदा मतभेद दिसून आले आहेत. जेटली यांनी अनेकदा सुचवूनही राजन प्रत्येकवेळी आपल्या भूमिकेवर ठाम राहताना दिसले होते. त्यामुळे राजन यांना गर्व्हनरपदाची दुसरी टर्म मिळणार का, याबद्दल साशंकता व्यक्त करण्यात येत आहे.
रघुराम राजन यांच्यामुळे देशाचे नुकसान, परत शिकागोला पाठवा – सुब्रमण्यम स्वामी
याबद्दल विचारण्यात आले असता जेटली म्हणाले की, रिझर्व्ह बँक आणि वित्त मंत्रालय यांच्यात संस्थात्मक नातेसंबंध आहेत. हे नातेसंबंध खूपच परिपक्व असे आहेत. आम्ही देशातील दोन सर्वोच्च संस्थांच्या प्रमुखपदी असून आमच्यात अनेकदा चर्चा आणि विचारांची देवाणघेवाण होत असल्याचे जेटली यांनी म्हटले. मात्र, यावेळी त्यांनी राजन यांना गव्हर्नरपदाची दुसरी टर्म मिळणार की नाही, या प्रश्नाचे उत्तर देण्याचे टाळले. प्रसारमाध्यमांसमोर अशाप्रकारच्या विषयांची चर्चा करायची नसते, असे जेटली यांनी सांगितले. रघुराम राजन यांच्या गव्हर्नरपदाची मुदत येत्या सप्टेंबर महिन्यात संपुष्टात आहे. या पार्श्वभूमीवर राजन यांनी काही दिवसांपूर्वी दुसऱ्यांदा गव्हर्नरपदासाठी इच्छूक असल्याचे संकेत दिले होते. गव्हर्नर म्हणून कामाचा प्रत्येक क्षण माझ्यासाठी आनंदमयी होता. मात्र, अजूनही बऱ्याच गोष्टी करायच्या आहेत, असे राजन यांनी म्हटले होते.
फेरनियुक्तीसाठी राजन उत्सुक!