RBI Fake Video : गेल्या काही वर्षांपासून फसवणुकींच्या गुन्ह्यात कमालीची वाढ झाली आहे. यातच जगात तंत्रज्ञानाचा जसा फायदा आहे, तसा त्याचा तोटाही आहे. कारण तंत्रज्ञानाचा वापर करुन अनेकदा सायबर गुन्हेगारांनी अनेकांची मोठी फसवणूक केल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. आता अशीच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा एक डीपफेक व्हिडीओ (Deepfake Videos) तयार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एवढंच नाही तर यामधून गुंतवणुकीचा सल्ला देण्यात आला असून यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल आहे. मात्र, यानंतर आरबीआयकडून एक निवेदन जारी करण्यात आलं असून अशा खोट्या व्हिडीओच्या विरोधात आरबीआयने जनतेला सावधानतेचा इशारा दिला आहे. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

हेही वाचा : निवडणुकीत पैशांचा पाऊस; महाराष्ट्र, झारखंड मध्ये २०१९ पेक्षा सात पट अधिक रक्कम जप्त; आकडा ऐकून थक्क व्हाल

दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १९ नोव्हेंबर २०२४ रोजी एक निवेदन जारी करत सामान्य नागरिकांना सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओबद्दल चेतावणी दिली आहे. फसवणूक करणाऱ्यांनी या व्हायरल व्हिडीओमध्ये आर्थिक सल्ला देताना दाखवण्यात आलं असल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

याबाबत आरबीआयने म्हटलं की, ही माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निदर्शनास आली आहे की, गव्हर्नर शक्तीकांत दास (Shaktikanta Das) यांचा एक बनावट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आरबीआय गव्हर्नर काही गुंतवणूक योजना सुरू करताना किंवा समर्थन करताना दाखवण्यात आलं आहे. मात्र, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अशा प्रकारे आर्थिक गुंतवणुकीचा सल्ला देत नाही, असं आरबीआयकडून सांगण्यात आलं आहे.

आरबीआयने काय स्पष्टीकरण दिलं?

आरबीआयने म्हटलं की, त्यांचे अधिकारी अशा कोणत्याही प्रकाराला समर्थन देत नाही. हे व्हिडीओ बनावट असून आम्ही अशा कोणत्याही आर्थिक गुंतवणुकीचा सल्ला देत नाहीत. अशा परिस्थितीत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या डीपफेक व्हिडीओपासून नागरिकांनी सावध राहावं, असं आवाहन आरबीआयकडून करण्यात आलं आहे.