नोटाबंदीच्या निर्णयानंतर सातत्याने नवनवे नियम लागू करण्यात येत असल्याच्या मुद्द्यावरून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी रिझर्व्ह बँकेला टीकेचे लक्ष्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी कपडे बदलतात तसे रिझर्व्ह बँक नियम बदलत आहे, असा उपरोधिक टोला राहुल यांनी हाणला आहे. पंतप्रधानांनी देशाला वचन दिले होते की ३० डिसेंबरपर्यंत बँकांमध्ये पैसे टाकता येतील, पण आता नियम बदलला, पंतप्रधानांच्या शब्दाला वजन असायला हवे, पण त्यांनी १२५ वेळा नियम बदलले. त्यामुळे पंतप्रधानांचे आश्वासन पोकळ ठरले आहे, असे राहुल यांनी म्हटले.
यापूर्वी राहुल गांधी यांनी मोदी सरकारचा निर्णय देशातील ९९ टक्के गरीब जनतेविरोधात असल्याचे म्हटले होते. सरकारने भ्रष्टाचाराला चाप लावण्यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेतला असता तर आम्ही त्यांच्या पाठिशी उभे राहिलो असतो. मात्र, मोदींनी घेतलेला निर्णय भ्रष्टाचाराविरोधात नसून गरीब व शेतकऱ्यांविरोधातील आहे, असे राहुल यांनी जौनपूर येथील सभेत म्हटले होते. मोदी देशातील एक टक्का श्रीमंतांसाठी काम करत आहेत. पंतप्रधान मोदी देशातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करायला नाहीत. मात्र, ते विजय मल्ल्या यांच्यासारख्या कर्जबुडव्यांशी दयाळूपणे वागतात. मी जेव्हा पंतप्रधानांना शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याबद्दल विचारले तेव्हा त्यांनी तोंडातून चकार शब्दही काढला नाही, असेही राहुल यांनी सांगितले.
RBI is changing rules like the PM changes his clothes: Rahul Gandhi #demonetisation
— ANI (@ANI) December 20, 2016
PM ne desh se vaada kiya tha ki aap 30 Dec tak bank mein paisa daal sakte ho, lekin kal niyam badal diya. Vaada khokla tha:Rahul Gandhi pic.twitter.com/nVvFk6PNZJ
— ANI (@ANI) December 20, 2016
#WATCH PM promised that people can deposit money till Dec 30 but yesterday again changed the rule. His words don't carry weight:Rahul Gandhi pic.twitter.com/5BuD8iXBIM
— ANI (@ANI) December 20, 2016
निश्चलनीकरणानंतर उलटसुलट नियम जाहीर करण्याची मालिका खंडित होऊ न देता सरकारने सोमवारी आणखी एक म्हणजेच ५६ वा निर्णय जाहीर केला. त्यानुसार बंदी आणलेल्या पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटांच्या स्वरूपातील ५००० रुपयांहून अधिक रक्कम ३० डिसेंबपर्यंत एकदाच बँकेत भरता येणार आहे. तसे करतानाही ही रक्कम यापूर्वी का भरता येऊ शकली नाही याचे स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे. यासोबत भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरात बुधवारी कपात करण्यात आली. हे दोन निर्णय आधीच हक्काच्या पैशांसाठी कासाविस झालेल्या नागरिकांना दुहेरी चलनजाच ठरले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला तेव्हा ३० डिसेंबपर्यंत जुन्या नोटा बँकेत जमा करता येतील, असे म्हटले होते. त्यासाठी रकमेचे काही बंधन नव्हते. मात्र १७ डिसेंबरला सरकारने राजपत्रित सूचना जारी करून बँकेत पैसे जमा करण्यावर बंधन लादले आहे. आता जुन्या ५०० व एक हजाराच्या नोटांमधील ५ हजारांपेक्षा अधिक रक्कम ३० डिसेंबपर्यंत एकदाच बँकेत भरता येणार आहे. नोटाबंदीचा निर्णय जाहीर करून पाच आठवडे उलटले आहेत. एव्हाना बहुतांशी नागरिकांनी त्यांच्याकडील जुन्या नोटा बँकेत भरल्या असाव्यात. त्यामुळे बँकांमधील रांगा कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.