शुक्रवारी १९ मे रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं २००० रुपयाच्या नोटांचं वितरण बंद करण्याचा निर्णय जाहीर केला आणि देशभरात पुन्हा एकदा नोटबंदीची चर्चा सुरू झाली. या नोटांचं वितरण बंद करण्याचा निर्णय आरबीआयनं घेतला आहे. या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा नोटा बँकांकडून बदलून घेण्याची प्रक्रिया, त्याची मर्यादा, त्याची मुदत अशा सर्वच मुद्द्यांबाबत दावे केले जाऊ लागले आहेत. यासंदर्भात स्टेट बँक ऑफ इंडियानं मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. त्यानंतर आता आरबीआयनं देशभरातील सर्व बँकांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यासाठी बँकेकडून रीतसर नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे.
एएनआयनं यासंदर्भातलं आरबीआयचं पत्रक ट्वीट केलं आहे. सामान्य नागरिकांना वितरणातून बाद केलेल्या २००० च्या नोटा जमा करण्यासाठी याआधी ज्याप्रमाणे व्यवस्था करण्यात आली होती, तशीच व्यवस्था केली जाईल. २० हजार रुपयांपर्यंतच्या २ हजाराच्या नोटा इतर नोटांमध्ये बदलून मिळतील. याची सुरुवात २३ मे पासून होईल, असं आरबीआयकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेत नमूद करण्यात आलं आहे.
२००० च्या नोटा वैध राहतील
दरम्यान, याआधी ८ नोव्हेंबर २०१६ ला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घोषित केल्याप्रमाणे २००० रुपयांच्या नोटा लगेच चलनातून बाद होणार नाहीत. त्या ३० सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करता येतील, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. तोपर्यंत या नोटा वैध राहतील.
योग्य सुविधा पुरवण्याचे बँकांना निर्देश!
दरम्यान, नोटा बदलून घेण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांसाठी योग्य त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश आरबीआयनं आपल्या अधिसूचनेतून सर्व बँकांना दिले आहेत. यात सावलीसाठी शेड, प्रतीक्षा कक्ष, पिण्याच्या पाण्याची सुविधा अशा गोष्टींचा समावेश आहे. शिवाय, दररोज बँकेत जमा होणाऱ्या २ हजार रुपयांच्या नोटा आणि त्याबदल्यात दिल्या जाणाऱ्या नोटा यांची सविस्तर आकडेवारी आरबीआयकडून विहित करून दिलेल्या नमुन्यात भरून देण्याचेही निर्देश RBI नं सर्व बँकांना दिले आहेत.