सरकारच्या ऐतिहासिक नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकांकडे किती जुन्या नोटा जमा झाल्या, हा प्रश्न गेल्या अनेक दिवसांपासून विरोधकांसह सर्वसामान्य जनतेला सतावत होता. अखेर बुधवारी भारतीय रिझर्व्ह बँकेकडून या प्रश्नाचे उत्तर देण्यात आले. नोव्हेंबर महिन्यातील नोटाबंदीनंतर चलनातून बाद करण्यात आलेल्या ९९ टक्के जुन्या नोटा बँकामध्ये परत आल्या. केवळ १००० रूपयांच्या ८.९ कोटी इतक्या रकमेच्या नोटा बँकांमध्ये परत आल्या नाहीत. नोटाबंदीपूर्वी अर्थव्यवस्थेत ६३२.६ कोटी इतक्या रकमेच्या १००० रूपयांच्या नोटा चलनात होत्या. याचा अर्थ यापैकी १.३ टक्के नोटा बँकांकडे परतल्या नाहीत. आज प्रसिद्ध झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार अर्थव्यवस्थेतून बाद करण्यात आलेल्या एकूण चलनापैकी १५.२८ लाख कोटी इतक्या रकमेचे चलन रिझर्व्ह बँकेकडे जमा झाले आहे. यापूर्वी रिझर्व्ह बँकेने ३१ मार्च २०१७ पर्यंत जाहीर केलेल्या आकडेवारीत तत्कालीन अर्थव्यवस्थेत ५०० रूपयांच्या ५८८.२ कोटी रुपये इतक्या मुल्याच्या जुन्या व नव्या नोटा अस्तित्त्वात असल्याचे म्हटले होते. ३१ मार्च २०१६ मध्ये चलनात असणाऱ्या ५०० रूपयांच्या नोटांचे एकूण मुल्य १,५७०.७ कोटी रूपये इतके होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा