अपेक्षेप्रमाणे रिझर्व्ह बॅंकेने जूनमधील पतधोरण आढाव्यात रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. सध्याचा ६.५ टक्के रेपो दर कायम ठेवण्यात आला असून, रोख राखीवता प्रमाणातही (सीआरआर) बदल करण्यात आलेला नाही. तो ४ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. रिव्हर्स रेपो दरही ६ टक्क्यावर कायम ठेवण्यात आला आहे. बॅंकेने व्याजदर कायम ठेवल्याने कर्जदारांना सध्यातरी कुठलाही दिलासा मिळण्याची शक्यता नाही.


रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन हे रेपो व अन्य प्रमुख दर स्थिर ठेवण्याचीच शक्यता अधिक होती. एप्रिल महिन्यात वार्षिक पतधोरण आढाव्यात मध्यवर्ती बँकेने रेपो दरात पाव टक्क्याची दर कपात केली होती. पाठोपाठच्या दोन दुष्काळानंतर या वर्षी दीर्घकालीन सरासरीहून अधिक पावसाची शक्यता व्यक्त होत असली तरी अंदमानात बरसणारा पाऊस वेळेत केरळात पोहोचलेला नाही. त्यामुळे रेपो दरात कपात होण्याची शक्यता कमीच असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले होते. त्याप्रमाणेच रेपो आणि अन्य प्रमुख दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
जानेवारी २०१५ ते एप्रिल २०१६ दरम्यान रिझव्‍‌र्ह बँकेने रेपो दरात १.५०% दरकपात केल्याच्या पार्श्वभूमीवर मागील आर्थिक वर्षांत भारताची अर्थव्यवस्था ७.२% दराने वाढली. मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत अर्थव्यवस्था वाढीचा वेग ७.९% होता. अर्थव्यवस्था वाढ मोजण्याच्या पद्धतीबाबत संभ्रम असल्यामुळेही गव्हर्नर याहून अधिक व्याज दर कपात करतील, असे वाटत नव्हते.