गडचिरोलीमधील चार मतदान केंद्रांवर आज फेरमतदान होत आहे. एटापल्ली तालुक्यातील वटेली, गर्देवाडा, पुस्कोटी, वांगेतुरी या चार मतदान केंद्रावर हे फेरमतदान सुरु आहे. नक्षली कारवायांमुळे या मतदान केंद्रांवर ११ एप्रिल रोजी मतदान होऊ शकलं नव्हतं. नक्षलवादी कारवाया व निवडणूक पथकाच्या सुरक्षेच्या कारणामुळे गडचिरोली जिल्ह्य़ातील चार केंद्रांवर मतदान रद्द करण्याची नामुष्की गडचिरोली जिल्हा प्रशासनावर ओढवली होती. यामुळे आज फेरमतदान घेण्यात येत आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी तीन वाजेपर्यंत हे मतदान सुरु असणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

माओवाद्यांनी निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करीत गडचिरोली जिल्ह्य़ातील एटापल्ली तालुक्यातील गट्टा, पुरसलगोंदा आणि वाघेझरी येथे भूसुरुंग व आयडी स्फोट घडवले होते. यात गडचिरोली पोलीस दल व सीआरपीएफचे अनेक जवान जखमी झाले होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. अशा परिस्थितीत अतिशय दुर्गम भागातील काही मतदान केंद्रांवर निवडणूक पथक पाठवणे धोक्याचे होते. त्यामुळे निवडणूक पथकांना त्या-त्या परिसरातील पोलीस ठाणे व मदत केंद्रांवर थांबवून ठेवण्यात आले.

त्याशिवाय एटापल्लीपासून ९५ किमी अंतरावर छत्तीसगडच्या सीमेवरील वांगेतुरी, भुस्कोटी आणि भामरागड परिसरातील गर्देवाडा या मतदान केंद्रांवरही मतदान पथक पोहोचू शकले नव्हती. त्यामुळे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव तेथील मतदान रद्द केले होते. दरम्यान आज होत असलेल्या फेरमतदानाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

या निवडणुकीत गडचिरोली-चिमुर मतदारसंघात भाजपाकडून अशोक नेते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अशोक नेते यांच्यासमोर काँग्रेसच्या नामदेव उसंडी यांचं आव्हान आहे. तर वंचित बहुजन आघाडीने रमेश गजबे यांना उमेदवारी दिली आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Re voting on four polling booth in gadchiroli